वांग नदीत दुचाकी पडून आजी, नातवाचा मृत्यू , सात वर्षांच्या पोरीने बापाला वाचवले; कराडमधील घटना

 

वांग नदीवर असणाऱ्या फरशी पुलावरून दुचाकीवरून प्रवास करताना संरक्षक कठडा नसल्याने दुचाकी पुलावरून डोहात पडून चौघे पाण्यात बुडाले. यात आजी व नातवाचा मृत्यू झाला असून, पोहता येत असलेल्या सात वर्षांच्या मुलीने पित्याचे प्राण वाचवल्याची घटना कराड तालुक्यातील आंबवडे-कोळे येथे घडली आहे.

मालन भगवान यादव (वय 57), पीयूष शरद यादव (वय 4, रा. येरवळे, ता. कराड) अशी मृतांची नावे आहेत. तर, शरद यादव आणि तनुजा अशी बचावलेल्यांची नावे आहेत. शरद यादव हे आई मालन, मुलगी तनुजा आणि मुलगा पीयूषला घेऊन दुचाकीवरून आंबवडे येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन घेऊन ते घरी परतत असताना संरक्षण कठडे नसलेल्या पुलावरून त्यांची दुचाकी घसरली. त्याठिकाणी जुन्या पुलाचे बांधकाम सुरू असून, खडी व वाळू त्याठिकाणी पसरली आहे. त्यामुळे चौघेही दुचाकीसह साधारण 20 फूट खोल नदीच्या डोहात पडले. तिघांनाही पोहता येत नव्हते. प्रसंगावधान राखून पोहण्यात तरबेज असलेल्या तनुजाने बुडत असलेल्या आजीला अणि भावाला ओढत आणून पाण्याबाहेर काढले. पुन्हा शर्थीचे प्रयत्न करून वडिलांना पाण्याबाहेर काढण्यासाठी ती पुन्हा पाण्यात गेली. वडिलांना बाहेर काढत असताना काठावरील आजी अणि भाऊ पुन्हा घसरून पाण्यात पडले. घटनेची माहिती मिळताच येरवळेसह परिसरातील नागरिकांनी तिकडे धाव घेतली. पोलिसांना कळविण्यात आले. शोध मोहीम राबविली. त्यानंतर आजी आणि तनुजाच्या भावाला बाहेर काढण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. वडील शरद यादव यांना वाचविण्यात तनुजा यशस्वी ठरली.

तनुजाचे धाडस वाखाणण्याजोगे

केवळ सात वर्षांच्या तनुजाने आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी केलेले धाडस वाखाणण्याजोगे ठरले. पोहण्याच्या कलेचा पुरेपूर वापर करत तिघांचाही जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र, तिच्या धडपडीला पूर्णतः यश आले नाही.

 

आपली प्रतिक्रिया द्या