नवाज शरीफ यांच्या अडचणीत वाढ, लंडनमध्ये नातवंडांनाही अटक

36

सामना ऑनलाईन । लंडन

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ व त्यांची मुलगी मरियम सफदर यांना भ्रष्टाचाराप्रकरणी आज अटक होणार असतानाच शरीफ कुटुंबाच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. नवाज शरीफ यांच्या दोन नातवंडांना लंडन येथील त्यांच्या घराबाहेरून पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी नवाज शरीफांविरोधात आंदोलन करणाऱ्या काही व्यक्तींना मारहाण केल्याने त्यांना लंडन पोलिसांनी अटक केली आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जाणार तुरुंगात, दहा हजार पोलिसांची फौज सज्ज

नवाज शरीफ यांचे संपूर्ण कुटुंब सध्या लंडन येथील त्यांच्या घरी राहत आहे. शरीफ यांना भ्रष्टाचारा प्रकरणी शिक्षा ठोठावण्यात आल्या पासूनच दररोज त्यांच्या घराबाहेर पाकिस्तानी नागरिक व इम्रान खानचे काही समर्थक आंदोलन करत आहेत. काल रात्री नवाज शरीफ व मरियम शरीफ हे लंडनहून पाकिस्तानसाठी रवाना झाले. आज त्यांना पाकिस्तानात अटक होणार आहे. काल काही पाकिस्तानी नागरिक नवाज शरीफ यांच्या घराबाहेर आंदोलन केले. त्यावेळी नवाज शरीफ यांची मुलगी मरियम शरीफ हिचा मुलगा जुनैद सफदर आणि मुलगा हुसैन नवाझ याचा मुलगा झाकारिआ हुसैन हे घरात जात असताना काही जणांनी त्यांच्यावर आक्षेपार्ह टिपणी केली. त्यांनंतर जुनैद सफदर व झाकारिआ हुसैन भडकले. त्यानंतर त्यांच्यात व काही आंदोलनकर्त्यांमध्ये वाद झाला. वादाचे रुपांतर काही वेळातच हाणामारीमध्ये झाले. याप्रकरणी पोलिसांनी जुनैद सफदर व झाकारिआ हुसैन या दोघांना तसेच काही आंदोलनकर्त्यांना अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या