महात्मा गांधी आणि विनोबांना नमन करून निघाली ग्रंथदिंडी

‘वैष्णव जन तो तेने कहिये जे पीड़ परायी जाणे रे’ या भजनाचे सूर, कुठे ‘जय हरी विठ्ठल’चा जयघोष, टाळमृदंगाची साथ, लेझीमचा ठेका, महापुरुषांच्या वेशभूषेतील मुले, मराठीची ध्वजपताका उंचावत नेणारे आश्वासक हात असे उत्साहवर्धक वातावरण अवघ्या वर्ध्यात पाहावयास मिळाले. महात्मा गांधी आणि विनोबांना नमन करून  ग्रंथदिंडी निघाली आणि अवघी नगरी मराठीच्या जयघोषात निनादून गेली.

96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास आज परंपरागत ग्रंथदिंडीने सुरुवात झाली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, आमदार पंकज भोयर यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळय़ाला माळा अर्पण करून  आणि दिंडीचे विधिवत पूजन झाले. त्यानंतर वाजतगाजत, विठ्ठलनामाच्या गजरात ग्रंथदिंडी संमेलन स्थळ असलेल्या महात्मा गांधी साहित्य नगरी, स्वावलंबी विद्यालयाकडे रवाना झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पोस्ट ऑफिस चौक, सेंट अँटॉनी नॅशनल स्कूल, छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी ही ग्रंथदिंडी निघाली.

ग्रंथदिंडीमध्ये विठ्ठल-रखुमाई, संत समर्थ रामदास स्वामी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ, चक्रधर स्वामी, महात्मा गांधी, तुकडोजी महाराज, संत जनाबाई, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माता, झाशीची राणी लक्ष्मीबाई, रझिया सुलताना, मदर तेरेसा आदी महापुरुषांच्या वेशभूषेत विविध शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले. ग्रंथदिंडीचे स्वागत ठिकठिकाणी पुष्पवर्षाव करून झाले.  n चरख्यावर सूतकताई ही वर्धा येथील परंपरा. या परंपरेचे दर्शन ग्रंथदिंडीत झाले.   n सेंट अँटनी नॅशनल स्कूलतर्फे ग्रंथदिंडी शाळेसमोर पोहोचताच सूत हार घालून आणि टिळा लावून ग्रंथदिंडीच्या वारकऱयांचे स्वागत करण्यात आले. दिंडीमध्ये जात, धर्म, विचार भेद दूर सारून सारेच सहभागी झाल्याचे चित्र होते.