नाकतोड्यांनी पाकड्यांच्या नाकी नऊ आणले, हिंदुस्थानकडून मदत लागण्याची शक्यता

1214

सात महिन्यांपूर्वी कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने हिंदुस्थानशी असलेले व्यापारी संबंध थांबवले होते. पण, आता पाकिस्तानवर ओढवलेल्या नाकतोड्यांच्या राष्ट्रीय संकटामुळे पाकिस्तानला नाक मुठीत धरून हिंदुस्थानशी व्यापार करावाच लागणार आहे. या हल्ल्यामुळे आधीच महागाईने आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानच्या नाकी नऊ आले आहेत.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही काळापासून पाकिस्तानात 9 लाख हेक्टर शेतजमिनीवर वाळवंटी नाकतोड्यांनी थैमान माजवलं आहे. नाकतोड्यांच्या हल्ल्यामुळे जवळपास 40 टक्के धान्य नष्ट झालं आहे. या नाकतोड्यांनी प्रामुख्याने गहू, कापूस आणि टोमॅटो या पिकांना लक्ष्य केल्याने आधीच अन्नसंकट ओढवलेला पाकिस्तान आणखी संकटात सापडला आहे. पाकिस्तानात सिंध प्रांतातील पिकांवर हल्ला केल्यानंतर आता नाकतोड्यांनी पंजाब या प्रांताकडे मोर्चा वळवला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात नाकतोड्यांनी हल्ला केल्यामुळे पाकिस्तान सरकारने हा हल्ला एक आणीबाणीची परिस्थिती असल्याचं जाहीर केलं आहे.

त्यामुळे आता हे संकट थोपवण्यासाठी पाकिस्तानला नाक मुठीत घेऊन हिंदुस्थानकडून कीटकनाशक आयात करावं लागणार आहे. कारण, आर्थिक संकटामुळे आधीच पाकिस्तानचे नागरिक त्रस्त आहेत. जर वेळीच निर्णय घेतला गेला नाही, तर पाकिस्तानमध्ये अन्न-धान्याचा भीषण तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिंदुस्थानविरोधात सतत गरळ ओकणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी 18 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या कॅबिनेट मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत हिंदुस्थानकडून कीटकनाशक आयात करण्याविषयी निर्णय होण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या