लग्नाच्या रात्री नववधूच्या पोटात दुखायला लागले, सत्य उजेडात येताच नवरा हादरला

ग्रेटर नोयडामध्ये राहणाऱ्या तरुणाला, नववधूने असं सरप्राईज दिलं की त्याला दिवसा तारे दिसले. कधी स्वप्नातही विचार केला नसेल अशा घटना नव्याने लग्न झालेल्या या तरुणासोबत घडल्या आणि लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तो बाप झाला.

ग्रेटर नोयडामध्ये राहणाऱ्या तरुणाचं लग्न तेलंगाणातील सिकंदराबादमध्ये राहणाऱ्या एका तरुणीशी ठरलं होतं. लग्नाच्या रात्री या नववधूच्या पोटात दुखायला लागलं होतं, म्हणून घाईघाईने सगळे विधी उरकण्यात आले आणि तिला रुग्णालयात नेण्यात आलं. लग्नाच्याच कपड्यांमध्ये हॉस्पीटलमध्ये आणण्यात आलेल्या या तरुणीला पाहून डॉक्टरही चक्रावले होते. त्यांनी या तरुणीची तपासणी केली आणि नंतर तिच्या नवऱ्याला भेटायला बोलावलं.

नवरा समोर बसताच डॉक्टरांनी सांगितलं की त्याची बायको गर्भवती असून तिची प्रसुती होणार आहे. हे ऐकून तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी या महिलेने बाळाला जन्म दिला. लग्न लागत असताना ही तरुणी 7 महिन्यांची गर्भवती होती. तिच्या घरच्यांना ती गर्भवती असल्याची बाब माहिती होती, मात्र ती नवऱ्याच्या घरच्यांपासून त्यांनी लपवून ठेवली होती. नववधूच्या पोटात खडे असल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचं तरुणाच्या घरच्यांना सांगण्यात आलं होतं. या शस्त्रक्रियेनंतर तरुणीचं पोट फुगल्याचं तिच्या घरच्यांनी सांगितलं.

नववधूने एका मुलीला जन्म दिला असून, सदर प्रकाराची दोन्ही बाजूने पोलीस तक्रार करण्यात आलेली नाही. दोन्ही कुटुंबांनी आपापसात निर्णय घेऊन पोलीस तक्रार न करण्याचा निर्णय घेतला होता. तरुणाने आणि त्याच्या घरच्यांनी या महिलेला घरात घेण्यास नकार दिला होता. ही बाब त्यांनी नववधूच्या घरच्यांचाही कानावर घातली. त्यांनी येऊन त्यांच्या मुलीला घरी नेण्याचा निर्णय घेतला.