थोरवीचे उत्तररंग

82

सारंगी आंबेकर

आज कदाचित म्युझियममध्ये फक्त वाद्यांच्या ‘बीन’ या वाद्याचा व बीतकार मुरादखाँ यांच्यावरील लेख वाचून हळहळण्याशिवाय पर्याय उरत नाही. हिंदुस्थानातील पूर्वापार प्रचलित असलेल्या बीन या वाद्याशी आपलीं संचित जोडणाऱ्या  अवलिया मुरादखाँ यांच्या वादनाचा बाज बीन वादनाविषयी पं. भातखंडे यांची परखड मते, ‘बीन’ इतकीच सतारीवरील प्रभुत्व आणि वाद्याइतकाच स्वभावातील गोडवा यांचे देवधरांनी घडवलेले दर्शन अमूल्य आहे.

गायनाचार्य भास्करबुवा बखले यांचे चरित्र वाचकांना अद्वितीय गायकी अजाणत्या वयात ऐकणारे प्रो. देवधर जेव्हा त्यांच्याबद्दल लिहितात तेव्हा त्याचा आशय वेगळाच डौल घेऊन प्रकट होतो. भास्करबुवांच्या शिक्षणपद्धतीची प्रामाणिक माहिती देणारे शिष्य बळवंतराव कर्वे, ताराबाई शिरोडकर, गोविंदराव टेंबे, पं. दिलीपचंद्र तेरी, पं. रमेशचंद्र ठाकूर यांना बोलते करण्याचे कसब देवधरांना साधते. शिवाय प्रत्यक्ष भास्करबुवांच्या पत्नीकडूनच फैजमहमंदखाँ, नथ्थनखाँ व अल्लादियाँखाँसाहेबांकडून भास्करबुवांना मिळालेल्या तालमीचे तपशील कळतात.

महियर घराण्याचे उस्ताद अल्लाउद्दीन खाँ अर्थात उस्ताद अलिअकबर खाँ (सरोद) भिन्नपूर्णादेवी व पं. रविशंकर आणि असंख्य ज्ञानपिपासूंना विद्यादान करणाऱ्या या तपस्वीने व्हायोलीन, सतार, सरोद, क्लॅरिओनेट गायन, सूरबहार हे साज व विद्या कशी आत्मसात केली याचे विस्तृत वर्णन वाचून खाँसाहेबांच्या साधनेपुढे नतमस्तक व्हावे व देवधरांच्या प्रथम किंचितही अभिनिवेश नसणाऱया प्रांजळ लेखणीला याचे श्रेय द्यावे अशा विचारात मी आहे.

गाण्याबजावण्यात ‘मजा आला’ या अनुभूतीचे मोल सर्वश्रेष्ठ आहे व त्यासाठी सोसावी लागणारी झळ हा घटक साधारण  संगीत विद्यालयात शिकवले जाऊ लागल्याच्या काळापर्यंत बहुतेक सर्व कलाकारांच्या बाबतीत तपशीलाच्या फरकाने पण समानरीत्या आढळतो. मोठ्या ख्यालात एखादी उपज सुरू केली की त्यात ते इतके रंगून जात की तालाचे ५/६ आवर्तन झाले तरी समेवर जाण्याची शुद्ध राहत नसे. ‘काल रात्री रहिमतखाँ यांचा स्वर कोणता होता’. ‘काळी तीन’ त्यावर बुवासाहेब म्हणाले, ‘तर मग माझे तंबोरे अर्धा स्वर जास्त म्हणजे पांढरी पाचमधे जुळवा’, ‘या वाद्याला हार्मोनियम म्हणतात. आम्ही याला ‘बेंडबाजा म्हणतो’ किंवा ‘खवैय्या सो गवैय्या’ ही म्हण म्हणून पुढे आलेल्या पक्वान्नांवर ते यथेच्छ हात मारीत’ हे वाचून विक्षिप्तपणा व कलेतील डूब यांचा परस्परसंबंध शोधून पाहावा असा मोह आवरून देवधरांनी पांडित्याच्या उभा केलेला सच्चा माणूस लाजवाब!

संगीतयात्रेतील प्रत्येकाने ऋणी असावे असे व्यक्तिमत्त्व म्हणजे पं. विष्णू दिगंबर पलुस्कर! अतिशय आब राखून लिहिलेला हा लेख देवधर आणि पलुस्कर यांच्या परस्पर बंधाविषयी किंवा एकूणच अधिक विस्तृत होऊ शकला असता पण गुरुप्रती दाटून आलेल्या भावनांपुढे शब्द थिटे पडतात हेच खरे!

देवधरांच्या ‘थोर संगीतकार’मधील १० वा लेख किराणा घराण्याचे अर्ध्वयू अब्दुल करीम खाँसाहेबांबद्दल आहे. खाँसाहेब गोबरहार बाणीची गायकी अर्थात करुण किंवा शोकरसपूर्ण गात. १८७२ साली जन्मलेल्या खाँसाहेबांनी वडील कालेखाँ व चुलते अब्दुल्ला खाँ यांच्याकडून तालीम घेतली. देवधर पाच वर्षांचे असताना ऐकलेल्या अब्दुल करीम खाँसाहेबांच्या गायनाचा परिणाम म्हणून संगीत हेच आयुष्याचे ध्येय ठरवले यात बराच आशय दडलेला आहे. खाँसाहेबांच्या गायकीची खासियत, त्याची उदंड विस्तारलेली शिष्यशाखा या ज्ञान गोष्टींपलीकडील ‘आर्य संगीत विद्यालया’चे संस्थापक, मुक्तकंठाने विद्यादान करणारे कणयुक्त गायकी महाराष्ट्रात रुजवणारे, मिरज सांगलीकडील ताशेवाले, बँडवाले यांना उरुसात बोलावून त्यांच्या चढाओढी लावून स्वखर्चाने पारितोषिके देणारे खाँसाहेब, शिकारीचा शॉक असणारे खाँसाहेब वर्णिताना देवधरांच्या लेखणीनेही हात आखडता घेतलेला नाही.

खाँसाहेब रजब अली खाँ (१८७५-१९५९) म्हणजे ”विद्वता, कलेतील कसब, औदार्य व विक्षिप्त, लहरी स्वभाव, पैशाबद्दलची बेफिकीरी, कपड्यांचे व अत्तराचे शौकिन” अशा तान्याबान्याने जुमलेला एक अनोखा पट! संगीतसम्राट अल्लादिया खाँसाहेबांच्या गाण्याशी ज्यांची तुलना केली गेली, संगीत क्षेत्रातील एकमेव गणला जावा असा खटला ज्यांच्याविरुद्ध लढवला गेला व पं. वि.ना. भातखंडे यांनी प्रतिवादीतर्फे लढून त्यांना या गंडांतरातून बाहेर काढले असे वल्ली देवधरांसमवेत भेटतात. तेव्हा वाचकांसाठी तो सोहळाच होतो. दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीने रजबअली खाँसाहेबांचे गाणे जतन केले आहे हा प्रशंसनीय भाग.

‘थोर संगीतकार’मधील हृदयस्पर्शी कथा म्हणून म्हणता येईल ते म्हणजे मिरजेच्या पं. वामनबुवा चाफेकरांवरील लेख. देवधरांच्या ‘शापित गंधर्व” हा उल्लेख सुरुवातीच्या दोन स्वरांत गायकाने राग उभा करावा अशा ताकदीचा आहे. आवाजाची ईश्वरी देणगी, तानेतील सहजपणा, आत्यंतिक सुरेलपणा, लयकारीवर प्रभुत्व याचबरोबर पं. बाळकृष्णबुवांची तालीम, कोणालाही न तालीम दिलेल्या अशा हुमऱ्यांचा साठा ज्या पं. बाळकृष्णबुवा केवळ आत्मसुखासाठी गात एवढी पुंजी असूनही दुर्दैवाच्या फेऱ्यामुळे मिरजेची वेसही न ओलांडलेल्या वामनबुवांचा प्रवास क्लेषकारक आहे. १९३४ साली श्रीमंत बाळासाहेब मिरजकरांच्या ज्युबिली समारंभात पं. वामनबुवांचा मुलतानी असा काही असर करून गेला की त्यानंतर खाँसाहेब अब्दुल करीम खाँसाहेबांना रंग न जमवता आल्यामुळे १५/२० मिनिटांत गाणे आवरते घ्यावे लागले यावरून बुवांचे संगीतातील अढळपद लक्षात यावे.

आपली प्रतिक्रिया द्या