ठसा-मालतीताई किर्लोस्कर

30

सामना ऑनलाईन

महाराष्ट्राच्या वाङ्मयीन इतिहासात `किर्लोस्कर’ मासिकाचे एक वेगळे योगदान राहिले आहे. `किर्लोस्कर’, `स्त्री’ आणि `किशोर’ या मासिकांनी स्वत:चे स्थान निर्माण केले होते. त्यापैकी `किर्लोस्कर’चे संपादक मुकुंदराव किर्लोस्कर यांच्या भगिनी म्हणजे मालतीताई किर्लोस्कर. मालतीताई व्यवसायाने प्राध्यापक होत्या. सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालयात त्यांचे पदव्युत्तर शिक्षण (एम.ए.) झाले. त्यापूर्वी मुंबई विद्यापीठातून त्यांनी मराठी विषय घेऊन बी.ए. केले. बी.ए. त्या प्रथम श्रेणीत तर उत्तीर्ण झाल्याच, पण त्याचबरोबर `तर्खडकर सुवर्णपदक’ मिळविण्याचाही मान त्यांनी मिळवला होता. पुढे सांगलीलाच मालतीताईंनी आपली कर्मभूमी म्हणून निवडले. अन्य किर्लोस्कर मंडळींप्रमाणे पुण्यात न जाता त्यांनी सांगलीच्याच विलिंग्डन महाविद्यालयात मराठीच्या अध्यापनाचा पेशा स्वीकारला. तब्बल ३८ वर्षे त्यांनी तिथे मराठीचे अध्यापन केले. अर्थात, अध्यापनाशिवाय साहित्य, लेखन क्षेत्रातही त्यांचे योगदान मोठे आहे. विलिंग्डन महाविद्यालयातील विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका हा जसा त्यांचा लौकिक होता तसेच साहित्य वर्तुळातही मालतीताईंना आदराचे स्थान होते. स्फूट आणि ललित लेखन हा त्यांचा आवडता प्रांत. त्या प्रांतात त्यांनी विपुल लेखन केले. अनेक दैनिके, साप्ताहिके आणि मासिकांमधून त्यांचे हे साहित्य प्रसिद्ध झाले आहे. स्वत:च्या आठवणींवर आधारित `फुलांची ओंजळ’ आणि `भावफुले’ ही त्यांची दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत. `सप्तसरिता’ नावाने प्रकाशित झालेल्या आधुनिक स्त्रियांच्या काव्यसंठाहाला मालतीताईंनी प्रस्तावना लिहिली होती. मराठीतील अनेक दिग्गज कवयित्रींच्या कवितांचा त्या संठाहात समावेश होता आणि त्यांची निवडही मालतीताईंनीच केली होती. मालतीताई विचारांनी आधुनिक आणि पुरोगामी होत्या. मुख्य म्हणजे त्या स्पष्टवक्त्या होत्या. त्यामुळे काही वेळेस माणसे दुखावली गेली तरी मालतीताईंचा त्यामागे कुठलाही स्वार्थी हेतू नसल्याने महाविद्यालय आणि साहित्य वर्तुळात त्यांचे नेहमीच आदराचे स्थान राहिले. त्यांच्या निधनाने देशाच्या उद्योग क्षेत्राप्रमाणेच मराठी साहित्य आणि वाङ्मय क्षेत्राला किर्लोस्कर घराण्याने दिलेला आणखी एक दुवा निखळला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या