ग्लोबल वॉर्मिंगवरून शक्तिशाली नेत्यांना सुनावणारी ग्रेटा थनबर्ग बनली ‘पर्सन ऑफ द इयर’

497

तिचे वय खेळण्याचे, बागडण्याचे… पण अवघ्या 16 व्या वर्षीच तिने पर्यावरण वाचवण्यासाठी, पृथ्वी वाचवण्यासाठी जागतिक आंदोलन उभे केले. सप्टेंबरमध्ये न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान बदल परिषदेत तीने थेट शक्तिशाली नेत्यांनाच फैलावर घेतले. तुम्ही आमचे बालपण, आमची शाळा, आमचा आनंद हिरावून घेतला असा ठपका ठेवत हवामान बदलाच्या केवळ गप्पा मारण्याची तुमची हिंमत तरी कशी होते, असा खडा सवालही तिने केला. ग्रेटा थनबर्ग तिचे नाव. स्वीडनची ही 16 वर्षीय ग्रेटा ‘टाइम’ मॅगझीनच्या ‘पर्सन ऑफ द इयर’ या पुरस्काराची मानकरी ठरली आहे. ‘टाइम’ मॅगझीनच्या कव्हरपेजवर तिचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले असून हा सन्मान मिळवणारी ती सर्वात कमी वयाची तरुण व्यक्ती ठरली आहे.

11 वर्षांची असताना ग्लोबल वॉर्मिंगबद्दल ऐकले आणि तिने मनाशीच पृथ्वी आणि पर्यावरण वाचवण्यासाठी काहीतरी करण्याचा निश्चय केला. गेल्या वर्षी तिने शाळा बुडवून स्वीडनच्या संसदेबाहेर ग्लोबल वॉर्मिंगविरोधात आंदोलन पुकारले. ‘पृथ्वी वाचवा, पर्यावरण वाचवा’ असा टाहो फोडला. तिचे हे आंदोलन जगभरात वणव्यासारखे पसरले आणि आता शेकडो देशांमध्ये वसुंधरा मेळावे घेतले जाताहेत. ग्रेटाच्या उल्लेखनीय कार्यामुळे ‘राइट लाइव्हलीहूड’ या नोबेल पुरस्काराचीही ती विजेती ठरली आहे.

विमान प्रवास टाळून सागरी मार्गाने पोहोचली परिषदेत
प्रचंड कार्बन उत्सर्जन करणारा विमान प्रवास टाळून ग्रेटा सौरऊर्जेवर चालणाऱया यॉटमधून सागरी मार्गाने प्रवास करत न्यूयॉर्कमधील जागतिक हवामान बदल परिषदेत पोहोचली. ब्रिटनमधून 15 दिवसांचा सागरी प्रवास तीने केला. ‘नो वन इज टू स्मॉल टू मेक द डिफरन्स’ हे ग्रेटाच्या भाषणाचे पुस्तकही प्रसिद्ध झाले असून त्यासाठी तिला मिळणारी सर्व रॉयल्टी तिने पर्यावरण चळवळीला दिली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी दावोस जागतिक अर्थ परिषदेतही तीने भाषण केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या