लग्नघटिका समीप येताच प्रेयसीची एंट्री! नवरदेवाची धुलाई, वधूचे आत्याच्या मुलाशी लग्न

सामना प्रतिनिधी, नांदेड

स्थळ-कौठा येथील मंगल कार्यालयात वेळ संध्याकाळी सहा वाजता. भटजींनी मंगलाष्टक सुरू केले. ‘ताराबलं लग्नबलं तदेव…..’ आणि अचानक नवरदेवाच्या प्रेयसीने एंट्री घेतली. त्यानंतर प्रेयसीच्या नातेवाईकांनी नवरदेवाची चांगलीच धुलाई केली. आणि नवरदेवाचे नातेवाईक लग्न मंडपातून पसार झाले. त्यानंतर काहींनी मध्यस्थी करून या वधूचे लग्न त्यांच्याच नात्यातील एका युवकाशी लावून देण्यात आले.

चित्रपटात साजेसा असा हा प्रसंग कौठ्यामध्ये घडला. त्याचे असे झाले,  कौठा येथील एका वधूचे लग्न कौठ्याच्या शिव गोविंद मंगल कार्यालयात कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव येथील अरविंद जगदेवराव साखरे याच्याशी होत होते. लग्नघटिका जवळ आली आणि मंगलाष्टके सुरू होताच या नवरदेवाची प्रेयसी तिच्या नातेवाईकांसह लग्नमंडपात आली आणि प्रेयसीच्या नातेवाईकांनी नवरदेवास मारहाण करण्यास सुरुवात केली. वधूकडील मंडळींना हे काय घडते आहे समजेना. त्यांनी त्या प्रेयसीच्या नातेवाईकांना विचारले असता त्या प्रेयसीशी अरविंदशी प्रेमसंबंध आहेत आणि अरविंदने तिची फसवणूक केली आहे असे सांगून नातेवाईकांनी अरविंदची धुलाई केली. हे सर्व पाहून नवरदेवाकडील मंडळींनी मंडपातून पोबारा केला.

वधूकडील मंडळी आश्चर्यचकित होऊन हे सर्व पाहत राहिली. प्रेयसीच्या नातेवाईकांनी नवरदेवाला पकडून ठेवले आणि पोलिसांना बोलवा असा धोशा लावला. पोलिसांना पाचारण करण्यात आले, परंतु पोलीस उशिरा आले. तोपर्यंत कौठ्याचे नगरसेवक राजू गोरे, शिवसेनेचे नीळकंठ गोरे यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रेयसीचे नातेवाईक ऐकण्यास तयार नव्हते. अखेर पोलीस नवरदेवास घेऊन पोलीस ठाण्यात गेले. घडल्या प्रकाराने व्यथित झालेल्या वधूकडील मंडळींना काहीच सुचेना. अखेर वधूच्या आत्याच्या मुलाशी तिचा विवाह लावून देण्यात आला. आणि त्या घटनेचा सुखांत झाला. यासंदर्भात ग्रामीण पोलीस ठाण्यात विचारणा केली असता संबंधित कॉन्स्टेबलने आम्हास याची काहीही माहिती नाही, अशा शब्दात उत्तर दिले. जिल्हा पोलीस जनसंपर्क कार्यालयातूनही यासंबंधी गुन्हा दाखल झाला किंवा नाही याची माहिती कळाली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या