प्रभाकर वासुदेव पटवर्धन

126

<<गुरुनाथ वसंत मराठे>>

आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला जशी संत परंपरा लाभलीय तशीच कलाकारांचीदेखील परंपरा लाभली आहे. उदा. द्यायचे झाले तर तबल्यामध्ये उस्ताद अहमदजान थिरकवा, उस्ताद अल्लारखा, झाकीर हुसेन, पंडित सुरेश तळवलकर, मुकुंद काणे, शाम काणे, यांच्या तोडीस तोड किंबहुना त्याच्या पंक्तीत जाऊन बसणारे एक नाव आवर्जून घ्यावे लागेल ते म्हणजे प्रभाकर वासुदेव ऊर्फ बापू पटवर्धन. या सर्वांनी आपल्या स्वतंत्र शैलीने तबल्याला एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले. बापू पटवर्धन यांचा जन्म १९३६ साली मुंबई येथे झाला. बापूंचे शिक्षण एसएससीपर्यंत झाले, परंतु घरच्या बेताच्या आर्थिक स्थितीमुळे महाविद्यालयीन शिक्षणाचा विचार त्यांना सोडून द्यावा लागला. बापूंच्या घराण्यात तबल्याची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती, परंतु त्यांच्या घरात संगीताचे सूर मात्र निनादत होते. वडील वासुदेव पटवर्धन हे उत्तम गायक होते. १९४५ साली वडिलांचे अकाली निधन झाले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बापूंचे सर्वात धाकटे काका गोपाळराव पटवर्धन हेदेखील त्या काळचे प्रसिद्ध गायक होते. घरात संगीतमय वातावरण असल्यामुळे बापूंना ते कधी तबलावादक होतील याची पुसटशी कल्पनादेखील नव्हती. बापूंच्या तबला या क्षेत्रातील प्रवेशाला त्यांच्या घराण्यातील गायकीनेच मदत केली. बापूंचे थोरले बंधू विश्वनाथ ऊर्फ बाळू यांना काका गोपाळराव पटवर्धन यांनी गाणे शिकवण्यास सुरुवात केली. गाण्याला घरचीच कोणाची तरी तबला संगत लाभली तर सोन्याहून पिवळे असे समजून काकांनी त्यांना तबल्याचे धडे देण्यास सुरुवात केली. काका हे तबलावादक किंवा शिक्षक नव्हते. परंतु गायकांनासुद्धा थोडाफार तबला येत असे त्यानुसार त्यांनी बापूंना तबला वादनाचे शिक्षण दिले. साधारण १९४९ ते १९५३ साली रेडिओवर स्वतंत्र तबलावादनाचे कार्यक्रम होत. ते ऐकून बापूंच्या मनात सोलो वादनाविषयी आवड निर्माण झाली. याच काळात एका छोटेखानी संगीत बैठकीमध्ये गोविंदराव परसतवारांशी (तबलावादक) बापूंचा परिचय झाला. त्यांच्याकडे काही वर्षे तबलावादनाचे रीतसर शिक्षण घेतल्यानंतर कालांतराने परसतवारांचे निधन झाले आणि बापूंच्या तबलावादनात खंड पडला. १९६८ ते १९७२ या कालखंडात मित्रांच्या आग्रहाखातर काही तबल्याच्या शिकवण्या बापूंनी स्वीकारल्या. अखेर १९७२ साली बापूंच्या आयुष्यात सोनेरी संधी चालून आली म्हणा किंवा त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण आला तो म्हणजे पै. ‘पद्मभूषणउस्ताद अहमदजान थिरकवा यांची एनसीपीए या संस्थेने तबल्याचे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली. बापूंनी रीतसर त्यांचा गंडा बांधून शिक्षण घेण्यास सुरुवात केली. हा बापूंच्या आयुष्यातील सोनियाचा दिनहोता. थिरकवा यांनी बापूंना तावून सुलाखून एक अस्सल सोने तयार केले. थिरकवा यांच्याप्रमाणे बापूंनीदेखील तरुणांना शिकवताना अथक मेहनत करून आपल्या हाताखाली अनेक विद्यार्थी घडवले. शेवटी होतकरू तरुणांना तबल्यातील खाचाखोचा, बारकावे समजावे म्हणून बापूंनी तबल्याचा बारकाईने अभ्यास करून स्वतःचे तबल्याचा अंतर्नादहे पुस्तक प्रकाशित केले. ते युवकांनी वाचावे असेच आहे. या पुस्तकाचे प्रकाशन पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ यांनी केले आहे. त्यांना बापू शतशः धन्यवाद देतात. यापूर्वी कोणीही तबल्याच्या वादन तंत्रावर पुस्तक प्रकाशित केल्याचे ऐकिवात नाही. वयाच्या ८२ व्या वर्षीही तबल्याला कलेचा श्वास आणि ध्यास मानलेल्या बापूंचा हा प्रवास असाच पुढे सुरू राहो.

आपली प्रतिक्रिया द्या