करवसुलीच्या झोळीत 2 लाख कोटींची पोकळी, टॅक्स कपातीचा सरकारला फटका

388

आर्थिक मंदीमुळे लडबडलेल्या हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेला करवसुलीच्या रुपात आणखी एक झटका बसणार आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील करवसुलीत तब्बल 2 लाख कोटींची तूट राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कॉर्पोरेट टॅक्स कपात आणि जीएसटीची निराशाजनक वसुली याचा फटका अर्थव्यवस्थेला बसल्याचे चित्र आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 5 जुलैला अर्थसंकल्प सादर केला, त्यावेळी सरकारच्या तिजोरीत जवळपास 25 लाख कोटींच्या उत्पन्नाची भर पडेल, असा विश्वास व्यक्त केला होता. परंतु सध्या अर्थव्यवस्थेचा वेग कमी होण्याबरोबरच सरकारच्या उत्पन्नाला उतरती कळा लागली आहे. 2019-20 मध्ये कराच्या माध्यमातून एकूण 24.6 लाख कोटींचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज अर्थसंकल्पात वर्तवण्यात आला होता. मात्र या उत्पन्नाची सरासरी राखण्यात सरकार अपयशी ठरले आहे. गेल्या महिन्यात कॉर्पोरेट टॅक्स कमी केल्यामुळे सरकारला 1.45 लाख कोटींच्या महसुलावर पाणी सोडावे लागले. त्यातच जीएसटीच्या उत्पन्नाची 91,916 कोटींपर्यंत घसरण झाली.

पुढील सहा महिन्यांत खर्चाला आळा घालावा लागणार
जीएसटीच्या उत्पन्नात 50 हजार कोटींनी घट होऊ शकते, असा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे. आर्थिक वर्षाच्या अखेरीस उत्पन्नातील करवसुलीची पोकळी पावणेतीन लाख कोटींपर्यंत वाढू शकते. या पार्श्वभूमीवर सरकारला पुढीला सहा महिन्यांत खर्चाला आळा घालावा लागेल, असे तज्ञांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या