‘जीएसटी’पर्व सुरू!

1

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘एक देश, एक वस्तू, एक कर’ अशी करप्रणाली असलेल्या ‘वस्तू आणि सेवा कर’ अर्थात ‘जीएसटी’च्या पर्वाला अखेर सुरुवात झाली आहे. मध्यरात्री संसदेच्या ऐतिहासिक सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या सोहळ्यात ‘जीएसटी’च्या अंमलबजावणीची औपचारिक घोषणा करण्यात आली. ‘जीएसटी’मुळे महागाई कमी होणार की वाढणार? दिलासा मिळणार का? याचीच उत्सुकता देशातील कोट्य़वधी जनतेला आहे.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या प्रमुख उपस्थितीत सेंट्रल हॉलमधील विशेष बैठकीला विविध राज्यांचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री, अनेक पक्षांचे खासदार, विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. ‘जीएसटी’मुळे महागाईला आळा बसेल, असे अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले, तर ‘जीएसटी’ हे कोणत्याही एका सरकारचे नव्हे, सर्वांच्या प्रयत्नांचे यश असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत ‘जीएसटी’चा स्वागत सोहळा सुरू होता.

काय महागणार?
पॅक्ड फूड, कॉर्नफ्लेक्स, कॉफी, च्युइंग गम, आईस्क्रीम, चॉकलेट, आयुर्वेदिक औषधे, मोबाईल फोन, मोबाईल फोनचे बिल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, इन्शुरन्स प्रीमियम, बँकिंग शुल्क, एअरकंडिशनर, फ्रीज, वॉशिंग मशीन, टीव्ही, सोने, 7500 रुपयांपेक्षा जास्त भाडे असलेले हॉटेल रूम्स, रेस्टॉरंटस्, पंचतारांकित हॉटेलांमधील रेस्टॉरंट, 100 रुपयांपेक्षा जास्त किमतीचे चित्रपट तिकीट, एक हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचे कपडे, शॅम्पू, एसी आणि फर्स्ट क्लास रेल्वे तिकीट, कुरीयर सेवा, ब्रॉडबॅण्ड सर्व्हिस, सलून.
काय स्वस्त होणार?
दुधाची पावडर, ताक, मध, डेअरी उत्पादने, पनीर, मसाले, चहा, गहू, तांदूळ, आटा, शेंगदाणा तेल, साखर, गूळ, साखरेचे पदार्थ, पास्ता, नूडल्स, फळे आणि भाज्या, लोणचे, मुरांबा, चटणी, मिठाई, केचअप ,सॉस, इस्टंट फूड मिक्स, मिनरल वॉटर, बर्फ, काजू, आंघोळीचा साबण, हेअर ऑइल, डिटर्जंट पावडर, साबण, टिश्यू पेपर, नॅपकिन्स, माचीस, मेणबत्ती, कोळसा, केरोसीन, घरगुती एलपीजी गॅस, चमचा, अगरबत्ती, टूथपेस्ट, दंतमंजन, काजळ, वह्या, पेन, ग्राफ पेपर, दप्तर.