‘जीएसटी’ नोटाबंदीनंतरची मोठी चूक ठरेल

14

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘जीएसटी’ म्हणजे वस्तू आणि सेवा कर लागू करण्यासाठी मोदी सरकारने चालवलेली घिसाडघाई ही नोटाबंदीनंतरची दुसरी मोठी चूक ठरेल असा इशारा तृणमूल काँग्रेसच्या नेत्या, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज दिला.

ममता बॅनर्जी इशारा देऊनच थांबल्या नाहीत. जीएसटी लागू करण्यासाठी शुक्रवार, ३० जूनच्या मध्यरात्री होणाऱ्या केंद्र सरकारच्या कार्यक्रमावर त्यांनी बहिष्कारही घोषित केला. ममता यांनी ‘जीएसटी’बाबत फेसबुकवर खास पोस्टच टाकून आपली नाराजी जाहीर केली.
जीएसटी अमलात येण्यास अवघे ६० तास उरले आहेत, पण जीएसटी लागू झाल्यानंतर नेमके काय घडणार याचा कोणालाच पत्ता नाही असे नमूद करतानाच जीएसटीमुळे व्यापारीवर्ग आणि विशेषतः मध्यम व्यापारीवर्ग भयभीत आणि संभ्रमात आहे असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
‘जीएसटी’ १ जुलैपासून लागू करण्यासाठी देशाची अद्याप काहीच तयारी नाही. नव्या करप्रणालीसाठी छोट्य़ा व्यापाऱ्यांकडे नव्या स्वरूपातील पावत्या नाहीत, माहिती-तंत्रज्ञान व्यवस्था नाही. त्यामुळे जीएसटीच्या पूर्वतयारीसाठी आणखी किमान सहा महिने मिळण्याची गरज आहे, असं मत ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलं.

आपली प्रतिक्रिया द्या