जिल्हा नियोजनातून विकासासाठी खर्च करणारा नगर जिल्हा राज्यात प्रथम- पालकमंत्री राम शिंदे

सामना ऑनलाईन । नगर

नगर जिल्हा वार्षिक योजनेतून वर्ष 2019 अखेर 584 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, त्यातील 580.14 कोटींचा निधी खर्च झाला आहे. जिल्ह्यात खर्च झालेल्या विधीची टक्केवारी 99. 21 इतकी आहे. त्यामुळे नगर जिल्हा राज्यात सर्वाधिक खर्च करणाऱ्या जिल्ह्याचा मान मिळाल्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी सांगितले. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात बोलत होते. यावेळी विजय औटी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने आदी उपस्थित होते.

नगर जिल्ह्याला 584.74 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. तसेच नागरी क्षेत्रातील विकासासाठी मागील वर्षाच्या तुलनेत 18.10 कोटींचा वाढीव निधीची तरतूद करण्यात आले आहे, शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार अभियान करता 20 कोटी रुपयांची वाढीव निधीची तरतूद करण्यात आली असल्याचेही शिंदे यांनी यावेळी सांगितले. नगर जिल्ह्यातील 7 तीर्थक्षेत्रांना क वर्ग दर्जा देण्यात आला असून त्याला मंजुरी देण्यात आली. यावेळी जिल्ह्यात दुष्काळामुळे ज्यांच्या जनावरांचा मृत्यू झाला आहे त्यांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या. जिल्ह्यात सध्या 498 चारा छावण्या सुरू असून त्यासाठी 46 कोटी 81 लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्यापैकी 35 कोटी 70 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत पंधरा हजार 831 मजूर सध्या उपलब्ध आहेत असे ते म्हणाले. तसेच यावेळी शेतकऱ्यांच्या विमा हप्त्याचे पैसे बँकेचे भरायचे राहिले होते त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हा बँकेला दिले असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या