पंढरपुरात पाडव्याचा उत्साह, विठुमाऊली सजली साखरेच्या हारांनी

सुनील उंबरे, पंढरपूर

आज चैत्र शुद्ध प्रतिपदा, हिंदू धर्मियांचं नवं वर्ष, या नवीन वर्षाचे औचित्या साधून परंपरेप्रमाणे आज पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावरील ब्रम्हध्वजाचे विधिवत पूजन करून तो मंदिराच्या शिखरावर लावण्यात आला. गुढीपाडवा आणि दसरा या दोन प्रमुख सणाला श्री विठ्ठल मंदिरावरील ब्रम्हध्वजाची जुनी भगवी पताका काढून त्या ठिकाणी नवी पताका लावली जाते.

मंदिराचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आणि त्यांच्या पत्नी मनीषाताई यांच्या हस्ते देवाची पूजा आणि ब्रम्हध्वजाचे विधिवत पूजन करण्यात आले. नववर्षाच्या निमित्ताने आज श्री विठ्ठल रखुमाईला भरजरी पोशाख करण्यात आला. देवाचे हे गोजिरवाणे रूप डोळ्यात साठविण्यासाठी मंदिरामध्ये भक्तांची रीघ लागलेली पाहायला मिळाली.

आज विठुमाऊलीच्या गळ्यामध्ये फुलं आणि तुळशीच्या हाराबरोबर साखरेचे हार घातले. मंदिरातील गाभारा विविध रंगाच्या फुलांनी अतिशय आकर्षकपणे सजविण्यात आला आहे. पंढरपूर हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असल्याने नवीन वर्षांच्या प्रारंभी आपल्या लाडक्या विठुमाऊलीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.