गुढीपाडव्याला बनवा पौष्टिक आणि लज्जतदार..

286

सामना ऑनलाईन । मुंबई

चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा होणारा गुढीपाडवा साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. शालिवहन शकाचा प्रारंभ याच दिवसापासून होतो. अनेक चांगल्या गोष्टींची सुरुवात करण्यासाठी हा एक उत्तम दिवस आहे. मात्र, सण म्हटला की पक्वान्नांची रेलचेलही असतेच. बासुंदी, श्रीखंड, पुरणपोळी असे पदार्थ तर आपण नेहमीच खातो. यंदा या नेहमीच्या पदार्थांपेक्षा काहीतरी वेगळं नक्की चाखून पाहा.

गुढीपाडव्याच्या दिवशी कडू-गोड खाण्याची परंपरा आहे. यामुळे शारीरिक आरोग्य चांगलं राहतं. तसंच खांडवी हा गोड पदार्थ प्रामुख्याने कोकणात खास पाडव्यासाठी केला जातो. गुढीपाडव्याच्या सणाच्या वेळी कैरीचा मोसम सुरू झाल्यामुळे आपण कैरीचे काही पदार्थ करू शकतो. कैरीच्या बरोबरीनेच द्राक्षाचा मोसम असतो. त्यामुळे द्राक्षाची कोशिंबीर देखील आपण गुढीपाडव्याच्या दिवशी खाऊ शकतो.

 • कडूगोड 
  साहित्य- कडुनिंबाची पाने, फुले, मीठ, हिंग, जिरे, मिरे, ओवा
  कृती- कडुनिंबाची पाने व फुले यांचे चूर्ण करावं त्यात मीठ, हिंग, जिरे, मिरे व ओवा हे पदार्थ घालावेत. हे तयार झालेले कडूगोड गुढीपाडव्याच्या दिवशी आरोग्यप्राप्तीसाठी घरातल्या सर्वांनी प्राशन करावं.

neem

 • खांडवी
  साहित्य – १ वाटी वऱ्याचे तांदूळ / भगर, एक/सव्वा वाटी साखर, अर्धी वाटी (किंवा आवडीप्रमाणे कमी जास्त) खवलेले ओले खोबरे, वेलची पूड, साजुक तूप १-२ चमचे
  कृती- एका पातेल्यात पाणी उकळत ठेवावे. दुसरीकडे कढईत साजुक तूप घालून वऱ्याचे तांदूळ जरासे परतून घ्यावेत. पाणी जरा उकळायला लागले की नुकत्याच परतलेल्या वऱ्याच्या तांदुळात उकळलेले पाणी घालून शिजू द्यावे. एक वाफ काढल्यावर त्यात साखर व वेलची पूड घालावे. हे वऱ्याचे तांदूळ, शिऱ्याप्रमाणे मऊसर शिजवून घ्यावे. एका ताटाला तुपाचा हात लावून त्यावर वऱ्याच्या तांदुळाचा पांढरा शुभ्र शिरा गरम असतानाच थापून घ्यावा. वर भरपूर ओले खोबरे पसरावे आणि वड्या पाडून घ्याव्या. नंतर वड्या घट्ट होण्यापुरते ताट शीतकपाटात (फ्रीजमध्ये) ठेवावे.

khadvi

 • कैरीचे सार 
  साहित्य- एक कैरी, एक ओला नारळ, अर्धी वाटी कोथिंबीर, तीन चार हिरव्या मिरच्या, मोहरी, एक वाटी गूळ, मीठ चवीनुसार
  कृती- उकडलेल्या कैरीचा बलक घ्यावा, नारळाचे दूध काढावे. मोहरी, मिरच्या, कोथिंबीर वाटून एकत्र करावी. सर्व मिश्रण मीठ व गूळ टाकून उकळावं. स्वादिष्ट हिरवेगार सार व फडफड्या भाताचा भरपेट आनंद घ्यावा.

rawmangogojju

 • कैरीभात 
  साहित्य- एक वाटी सुगंधी तांदूळ, एक चमचा चणा डाळ, उडीद डाळ, फुटाणे, शेंगदाणे, एक कांदा, सुक्या तीन चार मिरच्या, कढीलिंब (कडुनिंब), मीठ, साखर, हिंग, तमालपत्र
  कृती- तांदळाचा भात करून घ्यावा. गार झाल्यावर पसरट भांड्यात पसरावा. खमंग फोडणी करून त्यात भिजलेली चणाडाळ, उडीद डाळ, फुटाणे, शेंगदाणे, कांदा, मिरच्या, कढीलिंब, हिंग, तमालपत्र घालावं. नंतर भात घालून मीठ, साखर किसलेली कैरी घालावी. चांगली वाफ येऊ द्यावी.

raw-mango-rice-1

 • द्राक्षाची कोशिंबीर 
  साहित्य- एक वाटीभर द्राक्ष, एक चमचा डाळिंबाचे दाणे, मीठ, कोथिंबीर, एक हिरवी अथवा सुकी मिरची, जिरं दोन चमचे, वनस्पती तेल, एक वाटी गोड दही, साखर चवीनुसार
  कृती- द्राक्ष धुऊन बिया काढून कापावे, त्यात मीठ, साखर व डाळिंबाचे लालचुटूक दाणे मिसळावेत. तुपात मिरचीचे तुकडे, जिरे घालून फोडणी तडतडू द्यावी. फोडणी थंड झाल्यावर गोड दही फेटून कोशिंबिरीत घालावं. काचेच्या बाऊलमध्ये कोथिंबीर घालून सजवावी. चवीला अतिशय रुचकर व पौष्टिक अशी ही कोशिंबीर लहान मोठे आवडीने खातात.

grapes-salad

आपली प्रतिक्रिया द्या