गुढी पाडव्याचा हा इतिहास माहिती आहे का?

2585

बद्रीनाथ खंडागळे । पैठण

सम्राट शालिवाहनाने राजधानी पैठणनगरीतून प्रस्थापित केलेल्या कालगणनेनुसारच जगभर हिंदू नववर्ष साजरे केले जाते. सातवाहन कुळातील या सम्राटाने मातीच्या खेळण्यातील सैन्यावर अमृतजल शिंपडून त्यांना जिवंत केले अन् बलाढ्य शत्रूवर मात केली. अशी एक दंतकथा पैठणला प्रचलित आहे. मराठी मातीत जन्मलेल्या शालिवाहनाचे सैन्यही याच मातीतले होते. त्यांच्या पराक्रमाला चेतना देऊन या मराठी सम्राटाने सैन्याचा मराठी बाणा जिवंत केला असावा! महाराष्ट्राच्या धुळीकणातही पराक्रम आहे. ही मराठी मातीसुध्दा लढाऊ असल्याची ही ‘जिवंत दंतकथा’ मानायला कुणाची हरकत नसावी. प्रेरणादायी असलेल्या चैत्र शुद्ध प्रतिपदे निमित्त  गुढी पाडव्याचा सण साजरा होणार आहे.

४६० वर्षे राज्य करणारे सातवाहन राजघराणे !

हिंदुस्थानातील एक प्रबळ राजसत्ता म्हणून सातवाहन साम्राज्याचा गौरवाने ऊल्लेख केला जातो. मराठवाड्यातील गोदाकाठी वसलेल्या पैठणमध्ये या राजसत्तेचा उदय झाला.  सलग ४६० वर्षे राज्य करणारे हे एकच राजघराणे आहे. ३० सम्राट निर्माण केलेल्या या घराण्यातील सम्राट पुलूमाबी हा महापराक्रमी होता. त्याने ऊज्जनैच्या विक्रमादीत्याचा मानहानीकारक पराभव केला. याच दिवसापासून प्रतिष्ठान नगरीतून त्यांनी हिंदू कालगणनेला प्रारंभ केला. परंतु खेदाची बाब अशी की, दिनदर्शिका व प्रसार माध्यमातून केवळ ‘शके’ असा ऊल्लेख केला जातो. ‘शालिवाहन शके’ असे अवर्जून म्हटले तर या मराठी सम्राटाच्या अद्वितीय पराक्रमाला मानवंदना दिल्यासारखे होईल.

satvahan1-696x447

‘पालथी नगरी’त आजही सापडते मातीचे सैन्यदळ…

राजधानी पैठणच्या जुन्या भागाला ‘पालथी नगरी’ असे नाव आहे. पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असलेल्या या परिसरात आजही मातीपासून बनवलेले हत्ती, ऊंट, घोडे, सैनिक व विविध प्रकारची मातीची हत्त्यारे सापडतात. १९५६ त १९९५ या काळात ५ वेळा उत्खनन करण्यात आले. प्रत्येक वेळी मोठ्या प्रमाणात मातीची खेळणी सापडली आहेत. पिढ्यान् पिढ्या पैठणकर एक दंतकथा ऐकून आहेत. कुंभारवाड्यात जन्मलेल्या शालिवाहनाला बालपणी मातीची बनवण्याचा व त्यांच्यावर अमृतजल शिंपडून जिवंत करण्याचा छंद होता. या सैन्याच्या जोरावर त्यांनी संपूर्ण दक्षिण हिंदुस्थानार राज्य केले. असे म्हटले जाते. परंतु मातीमोल होत गेलेल्या मराठी स्वाभिमानाचा अंगार या सम्राटाने चेतवला असावा. गलितगात्र पराक्रमावर शौऱ्याची फुंकर मारुन त्यात प्राण ओतले असावे. मराठी मातीत शौर्य आहे… महाराष्ट्राच्या कणाकणात पराक्रमाचा जिवंतपणा आहे. हिच ‘जिवंत दंतकथा’  मानायला हवी.

प्राचीन ग्रंथातील पैठण व सातवाहनांचा उल्लेख

अनेक पुरातन ग्रंथांमध्ये राजधानी पैठण व सातवाहन राजघराण्यांचा उल्लेख आहे. गुनाढ्याच्या ‘ब्रहत्कथा’ मध्ये सम्राटाचा राजप्रसाद, प्रशस्त उद्यान, पुष्करणी, व भव्य सभागृहांचे विस्तृत वर्णन आहे. सोमदेवाच्या ‘कथा-सरीत-सागर’ व  ‘लिलावई आणि उदय सुंदरी’ या ग्रंथात तर पैठणचे गतवैभव रेखाटताना सातवाहनांच्या लोककल्याकारी राज्य कारभारावर शिक्कामोर्तब केले आहे. विदेशी जगप्रवाशी ‘टाँलेमी’ यानेसुध्दा पुलुबामी अर्थात सम्राट शालिवाहन यांचा ऊल्लेख ‘प्रतिष्ठान नगरीचा सम्राट’ असा केलेला आहे. एका गाथेत शालिवाहनाचे महत्व वर्णन करताना अदभूत कवीकल्पना साकारलेली आहे.
उत्तर ओ हिमवंतो दहीरो ।
त्यालाहणो राज्या ।।
समभार भरक्लांता तेच ।
पलहत्य ए पुहवी ।।
याचा अर्थ असा की, ‘उत्तरेकडे हिमालय आहे. आणि दक्षिणेला सातवाहन आहे… त्यामुळेच ही पृथ्वी समतोल राखून आहे !’ शालिवाहनाने स्वतः चा मुखवटा असलेली चांदीची नाणी चलनात आणली होती. इतिहास संशोधक तथा प्राचीन वस्तू संग्राहक कै. बाळासाहेब पाटील यांच्या पुराणवस्तु संग्रहालयात आजही ही नाणी पाहायला मिळतात. सातवाहन काळातील शिलालेख व अनेक वस्तू येथे जिज्ञासूंसाठी उपलब्ध आहेत.

राजवाडा, तिर्थस्थंभ अन् लोकगीते !

सातवाहन राजघराणे हे पैठणचेच असल्याचे अनेक पुरावे बहुतांश इतिहासकारांनी दिलेले आहेत. पैठण परिसरात अद्यापही लग्नातील मंगलाष्टके व लोकगीतांतून या राजघराण्याचा ऊल्लेख केला जातो. या घराण्यातील सम्राट हाल यांनी लिहीलेला ‘गाथासप्तशती’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यातही अनेक संदर्भ आहेत. दक्षिण हिंदूस्थानवर एकहाती सत्ता स्थापन केल्यावर शालिवाहनाने राजधानी पैठणला ‘तिर्थस्तंभ’ ची ऊभारणी केली. हे नितांत सुंदर दगडी शिल्प ‘पालथी नगरी’ ऊभे आहे. १९९७ साली शिवसेनेच्या सत्ताकाळात शिवशाही सरकारने या पुरातन ठेव्याला ‘राज्य संरक्षीत स्मारक’ म्हणून घोषित केले. गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या या तिर्थस्तंभाच्या समोरच सम्राट शालिवाहनांचा भव्य राजवाडा उभा आहे. परकीय आक्रमणानंतर या वाड्याचे रुपांतर मशिदीत केले गेले. या वाड्याच्या परिसरात आजही अनेक हेमाडपंथी खांब व नक्षीदार दगडी अवशेष पडलेले आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या