परदेशातील गुढीपाडवा, नात्यांमधला गोडवा वाढला

बाहरीनमधला गोड-गोड पाडवा

aashish-naik

>> आशिष नाईक

बाहरीन हे खरंतर मुस्लीम राष्ट्र मात्र इथे कडवा मुस्लीम प्रवाह नाही. त्यामुळे कायद्याच्या अखत्यारित राहून इथे हिंदू सण साजरा करण्यास अडथळा येत नाही. इथे राहणारी आम्ही सर्व मंडळी महाराष्ट्रात होतो अगदी तशाच पद्धतीनं गुढीपाडवा साजरा करतो. अनेकांना आश्चर्य वाटेल पण इथे एका मराठी व्यक्तीनं दुकान टाकलं आहे, जिथून आम्हाला सर्व वस्तू आणि पदार्थ मिळतात. त्यामुळे गुढीपाडवा साजरा करण्यास कोणताच अडथळा येत नाही. अगदी साखरेच्या हलव्यांचा गोड हार, कडुनिंबाची पानं सगळ उपलब्ध असतं. सकाळी लवकर उठून आम्ही शास्त्रोक्त पूजा करतो. नवीन कपडे किंवा पारंपारिक पेहराव करून घरात गुढी उभारतो. त्यानंतर मराठी मंडळात जमतो. तिथेही गुढी उभरतो, पूजा होते, भजन वैगरे होतं. मराठी मंडळाच्या जवळच गणपती मंदिर आहे. तिथे लोक दर्शनाला जातात. गोडधोड नाश्ता करून आम्ही कामावर हजर राहतो. कारण इथे या सणांना सुट्टी नसते.

वाचा: सामना गुढीपाडवा विशेष

संध्याकाळी मात्र पुन्हा मंडळात एकत्र जमण्याचं ठरलेलं असतं. त्यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. कुणी गाणं सादर करतं तर कुणी स्कीट करतात. मज्जा येते. यावेळी मंडळात आम्ही अन्य भाषिक म्हणजे गुजराती, हिंदी किंवा हिंदुस्थानच्या दक्षिणेकडील भागातून आलेल्या आपल्या हिंदुस्थानी बांधवांना देखील आमंत्रण देतो. तेही कार्यक्रमात आनंदाने सहभागी होतात. यामुळे आमच्या सगळ्यांमधील नात्यांमधला गोडवा वाढतो. असं असलं तरी आपल्या मराठी मातीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही हेही तेवढंच खरं…

यूकेमधला पाडवा जणू ‘आनंद मेळावा’

>> जयश्री काशिद

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात, कामानिमित्त बाहेरगावी परदेशी राहताना, क्षणभर स्वतःसाठी वेळ काढणं सुद्धा अवघड असतं.पण असे असुनही मराठी माणुस सण साजरे करणऱ्यास सदैव तयार असतो.

परदेशी राहून देखील आम्ही मराठी सण साजरे करतो. दिवाळी असो संक्रांत असो वा पाडवा वेगवेगळ्या सणांच्या निमंत्तानं आम्ही मराठी बांधव एकत्र येत असतो. इथल्या मराठी मंडळांकडूनही वेगवेगळ्या कार्यक्रम आयोजन करण्यात येते. मराठी सण म्हंटलं की गोड आणि पारंपारिक पदार्थ आलेच. याच बरोबर मंडळात अनेक उत्सवाच्या दिवशी पारंपारिक पोशाख घालून येतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत असे काही सांस्कृतिक कार्यक्रमही साजरे केले जातात.

दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील आम्ही ‘आनंद मेळावा’ साजरा करत आहोत. या निमित्ताने सगळ्यांनी घरी बनविलेल्या खास स्वादिष्ट पदार्थांचे स्टॉल लावले जातात आणि मग परदेशातही आम्हा सगळ्यांना त्याचा आस्वाद घेता येतो.

यूकेमध्ये आमचेही ‘इल्फर्ड मराठी’ मंडळ आहे. सर्व प्रथम घरी गुडी उभारून आणि त्याची पूजा करून आम्ही नवीन वर्षाची सुरुवात करतो. त्या नंतर मंडळातील कार्यक्रमांना हजेरी लावतो. मंडळात जमून सारे एकमेकांच्या भेटी घेतो कारण कामाच्या व्यस्ततेमुळे किंवा राहण्याची ठिकाणं दूर असल्यानं इतर दिवशी भेट होतेच असं नाही. मंडळात देखील गुढी उभारून तिची पूजा करून कर्यक्रमास सुरुवात होते. पारंपरिक कार्यक्रम आणि नंतर खवय्येगिरीचा बेत ठरलेला असतो. मिसळ, वडापाव, खमंग चाट… वैगरे चटपटीत पदार्थ खाऊन इल्फर्ड मित्र मंडळात ‘आनंदमेळावा’ साजरा करतो.

थोडक्यात आम्ही खा-प्या… मजा करा!! या प्रमाणे यंदाही आम्ही पाडवा साजरा करणार आहोत.

अन्य लोकांचे किंवा अन्य देशातील कार्यक्रमांची माहिती, फोटो, व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही त्याला जरूर प्रसिद्धी देऊ. आमचा ई-मेल आयडी- saamanaonline@gmail.com