अक्षय्य… शोभायात्रा

शोभायात्रा. आपल्या नव्या वर्षाची शान. पण सध्या कोरोनोनाच्या पार्श्वभूमीवर या शोभायात्रा अक्षय्य तृतियेला निघतील.

शोभायात्रा…महाराष्ट्राचं आकर्षण…नववर्षारंभ आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जाणाऱया गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षी गिरगाव आणि विविध ठिकाणी शोभायात्रा काढल्या जातात. धार्मिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व लाभलेल्या या सणाचे मोल शोभायात्रांद्वारे केले जाते. पारंपरिक पोषाख, ढोल-ताशा वादन, लेझीम, भव्यदिव्य देखावे, संस्कार भारती रांगोळ्या यांचे सादरीकरण आणि सामाजिक संदेश शोभायात्रांच्या माध्यमातून दिला जातो. सध्या मात्र जागतिक स्तरावर कोरोना विषाणूने थैमान घातल्यामुळे शोभायात्रा पुढे ढकलण्यात आली आहे. गिरगावात अक्षयतृतीयेच्या दिवशी 26 एप्रिल रोजी शोभायात्रा काढून गुढीपाडवा साजरा करण्यात येणार आहे.

गिरगावात होणाऱया स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या गुढीपाडवा साजरा करताना ‘कोरोना’विषयी जनजागृती करण्याचेही कार्यकर्त्यांनी ठरवले आहे. यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी ते गिरगाव परिसरात घरोघरी जाऊन करोना विषाणूसंदर्भात ‘न घाबरता करू जागरुकता’ याअंतर्गत समाज प्रबोधनाचे काम करणार आहेत. तसेच पाडव्याच्या आदल्या दिवशी संभाजी महाराज बलिदान दिन आणि 20 आणि 21 मार्च रोजी माधवबाग, सीपी टँक येथे सात हजार चौरस फूट महारांगोळी सोहळा होणार आहे.

गिरगावातली शोभायात्रा आणि गुढीपाडवा यांचं अतूट नातं आहे. आबालवृद्ध या पारंपरिक जल्लोषात मोठय़ा आनंदाने सहभागी होतात. जागोजागी गुढय़ा उभारून मंगलमय वातावरणाला उठाव देणाऱया या शोभायात्रा हे खास आकर्षण आहे. असे असले तरी सध्या कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी स्वतःची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्याकरिता शोभायात्रेसारख्या मोठय़ा प्रमाणात साजऱया होणाऱया सोहळ्यात सहभागी होतानाही प्रशासनातर्फे सांगण्यात येणाऱया सूचनांचे पालन करावे.

न घाबरता करू जागरुकता…
गुढीपाडव्याच्या दिवशी 25 मार्च रोजी सकाळी 8 वाजता गिरगावातील फडके श्रीगणेश मंदिर येथे गणेशपूजन करून 22 फूट उंच हनुमानाच्या हातातील गुढीची पूजा केली जाईल. त्यानंतर ठाकूरद्वार चौक गुढय़ांनी सजवून नववर्ष साजरे केले जाईल. त्यानंतर अक्षयतृतीयेच्या दिवशी नववर्षाच्या स्वागताचा उत्सव शोभायात्रा मिरवणुकीद्वारे जल्लोषात साजरा करण्यात येईल. हिंदू नववर्ष हा नवचैतन्याच्या सोहळा एखाद्या व्हायरसपुढे हरू देऊ नका, अशी माहिती कार्यकर्ते स्वामी चिंतापांडू यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या