गुजरातमध्ये कोस्ट गार्ड, एटीएसने पकडले 500 कोटींचे हेरॉईन

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

दहशतवाद विरोधी दल (एटीएस) आणि तटरक्षक दलाने संयुक्तपणे कारवाई करत गुजरात बंदरातील एका बोटीतून तब्बल 500 कोटींचे हेरॉईन जप्त केले. तस्करी करण्याच्या आरोपावरून त्यांनी नऊ इराणी नागरिकांनाही बेड्या ठोकल्या. पुरावा नष्ट करण्यासाठी तस्करांनी बोटीला आग लावली, मात्र बोट पूर्ण जळून जाण्याआधीच कोस्ट गार्डच्या जवानांनी बोटीतून 100 किलो हेरॉईन बाहेर काढले.

मिळालेल्या माहितीनुसार हे इराणी तस्कर पाकिस्तानातील ग्वादर बंदरातून हेरॉईन घेऊन गुजरात बंदरात येत होते. हेरॉईनची ही पहिली खेप त्यांना हमीद मलिक या पाकिस्तानी नागरिकाकडून मिळाली होती. गुजरात बंदरातून हे हेरॉईन देशातील वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचते केले जाणार होते. या तस्करीबाबत एटीएसला आधीच सुगावा लागला होता. त्यांनी तत्काळ कोस्ट गार्डच्या साथीने कारवाई करत गुजरात बंदरावर करडी नजर ठेवली होती. तस्करीच्या या प्रकारात एका हिंदुस्थानी व्यक्तीचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे. मात्र त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. अमली पदार्थ गुजरात बंदरात उतरल्यावर ही हिंदुस्थानी व्यक्ती ते देशभरातील ठिकाणांवर पोहोचविणार होती, अशी माहिती इराणी नागरिकांनी एटीएसला दिली.