बुडणाऱ्या तरुणांना वाचवण्यासाठी आमदाराने घेतली समुद्रात उडी, तिघांना वाचवण्यात यश

गुजरातमधील भाजप आमदार हिरा सोलंकी यांचे सध्या संपूर्ण देशात कौतुक होत आहे. हिरा सोलंकी यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता तीन तरुणांचे प्राण वाचवले आहेत. त्यांचा तरुणांना वाचवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बुधवारी दुपारी चार तरुण राजुला येथील खाडीत पोहण्यासाठी आले होते. त्यावेळी समुद्राच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. ते डुबतायत हे किनाऱ्यावरील लोकांना समजताच त्यांनी याबाबत पोलिसांना कळवले. त्यावेळी आमदार सोलंकी हे त्याच भागात होते. त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले आणि बोटीने ते तरुण ज्या ठिकाणी बुडत होते तिथे गेले. त्यानंतर कुणाला काही कळायच्या आत सोलंकी यांनी समुद्रात उडी घेतली व तीन तरुणांचा वाचवले. एक तरुण मात्र ते पोहोचायच्या आधीच बुडाला होता. तब्बल दोन तास शोध घेतल्यानंतर बचाव पथकाला त्याचा मृतदेह सापडला.जीवन गुजरिया असे त्या मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

हिरा सोलंकी हे अमरेली जिल्ह्यातील राजुला मतदारसंघाचे आमदार आहेत.