गुजरात- कोरोना योद्ध्यांच्या पगारात कपात, 2500 कर्मचाऱ्यांनी पुकारला संप

देशात कोरोनाचं संकट असताना सगळा देश त्याच्याशी लढत आहे. या युद्धात वैद्यकीय कर्मचारी सर्वात आघाडीवर आहेत. साहजिकच त्यांच्यावर अधिक ताण आहे. पण, असं असूनही गुजरातमध्ये पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आली आहे. याचा विरोध करत 2500 कर्मचारी संपावर गेले आहेत.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, अहमदाबाद येथील एसव्हीपी रुग्णालयात कोरोना योद्धे म्हणून काम करणाऱ्या पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यूडीएस या रुग्णालय प्रशासन चालवणाऱ्या कंपनीने त्यांना 20 ते 30 टक्के कपात करून पगार दिला आहे. तसंच जे मेडिकल कर्मचारी या दरम्यान क्वारंटाईन होत आहेत, त्यांनाही पगार काही टक्के कापून दिला जात आहे.

या पगार कपातीमुळे नाराज पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली होती. त्या हाकेला प्रतिसाद देत गुजरातमधील 2500 पॅरामेडिकल कर्मचारी संपावर गेले आहेत. गुजरात हे कोरोनाग्रस्त राज्यांमधील एक प्रमुख राज्य आहे. गुजरातमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या 20,097 इतकी आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात 480 नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या