गुजरातची अवस्था दिल्ली आणि महाराष्ट्रापेक्षाही वाईट! सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

supreme-court-of-india

देशात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच कोरोनाची प्रकरणे वाढल्यानंतरही लग्न आणि मोठय़ा समारंभाला परवानगी दिल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला चांगलेच फटकारले आहे. गुजरातची अवस्था दिल्ली आणि महाराष्ट्रापेक्षाही वाईट होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

कोरोना रुग्णांवरील उपचार व मृतदेहांच्या हाताळणीसंदर्भात सर्वेच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्या. आर.एस. रेड्डी व एम. आर. शाह यांचा समावेश असलेल्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात आणि आसाम या राज्यांतील कोरोना परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. आता या प्रकरणातील पुढील सुनावणी 27 नोव्हेंबर रोजी होईल.

दिल्लीतील परिस्थिती नोव्हेंबरमध्ये अधिक बिकट झाली आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या याचा अहवाल सरकारने दाखल करावा, असे निर्देश न्यायालयाने दिल्ली सरकारची बाजू मांडणारे महाधिवक्ता संजय जैन यांना दिले. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला रोखण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

महाराष्ट्रासह चार राज्यांकडून मागवले अहवाल

सण उत्सवाच्या काळात कोरोनाचा प्रसार वाढून दुसरी लाट येऊ शकते, असा इशारा केंद्रीय समितीने दिला होता. तशीच परिस्थिती देशात निर्माण होताना दिसत असून अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात आणि आसाम या चार राज्यांना कोरोनाच्या सद्य परिस्थितीचा दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या