डोक्यांची डबकी झाली! मग स्वच्छ काय झाले?

80

देश संकटात असताना सत्ताधारी विरोधक गुजरातच्या एका राज्यसभा जागेसाठी एकमेकांवर तलवारी चालवतात. हे राजकारण किळस आणणारे आहे, पणहमाम में सब नंगेअशीच सध्या स्थिती असल्याने दोष तरी कोणाला द्यायचा? गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीत पटेल यांना पाडण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग आणि काळ्या पैशांचा अमाप वापर झाला या आरोपांत तथ्य असेल तर मग देशात स्वच्छ काय झाले? डबकी तशीच आहेत सगळ्यांचाच विहार याच डबक्यांत सुरू आहे. हिंदुस्थानातील डोक्यांची डबकी झाल्याची खबर चीनला असल्यानेच कश्मीरमध्ये सैन्य घुसवण्याच्या धमक्या चीन देत असावा. गुजरातच्या राज्यसभा निवडणुकीसाठी दोन्ही बाजूंनी लावलेली ताकद डोकलामला लावली असती तर चिनी सैन्याने एव्हाना माघार घेतली असती.

चीनने कश्मीर आणि उत्तराखंडात घुसण्याची धमकी दिली आहे. डोकलामच्या मुद्यावरून चीन आणि हिंदुस्थानात आधीच महिनाभरापासून तणाव आहे. त्यावरून चीन हिंदुस्थानला धडा शिकविण्याच्या गोष्टी करीत आहे. त्यात या नव्या धमकीची भर पडली आहे. अशावेळी चीनशी मुकाबला करण्यासाठी आणि सीमांचे रक्षण करण्यासाठी सर्वांनीच छातीचा कोट करून लढण्याची तयारी करायला हवी, पण गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीत कोण जिंकणार, कोण हरणार यावरच सत्ताधारी व विरोधी पक्षाने बराच वेळ, पैसा, सत्ता व दबंगगिरी खर्च केली. साऱया देशाचे लक्ष लागून राहावे व सर्व शक्ती पणास लावून प्रतिष्ठेची खेळी करावी असे या निवडणुकीत काय होते? काँग्रेस पक्षाचे एक नेते अहमद पटेल यांचा पराभव करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कंबर कसली होती व पटेल यांच्या विजयासाठी काँग्रेसने देव किंवा अल्ला पाण्यात घातले होते. पटेल पडले नाहीत तर चीन, कश्मीरचा प्रश्न सुटणार नाही व पटेल जिंकले नाहीत तर ढासळलेल्या काँग्रेसचा जीर्णोद्धार होणार नाही असेच जणू या लोकांना वाटत होते. आता गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत व काँग्रेस फोडूनही सत्ताधारी पक्ष अहमद पटेल यांना पाडू शकला नाही. अमित शहा, स्मृती इराणी यांच्याबरोबर अहमद पटेलही राज्यसभेत पोहोचले आहेत. पटेल हे पडणारच असल्याने मी त्यांना मत दिले नाही, अशी भाषा काँग्रेसचे बंडखोर शंकरसिंग वाघेला करीत होते. अहमद पटेल हे म्हणजे कोणी

सरदार पटेल नव्हते

की त्यांच्या पराभवासाठी भारतीय जनता पक्षाने छातीचा  कोट करून ‘जंग’ छेडावी. पटेल यांचा पराभव व्हावा यासाठी काँग्रेस फोडली व काँग्रेसला सोपी वाटणारी निवडणूक कठीण केली. वाघेला हे त्यांच्या सात-आठ आमदारांना घेऊन भाजपच्या गोटात शिरले. अमित शहा व स्मृती इराणी यांच्याबरोबर भाजपने बलवंत रजपूत या वाघेला समर्थकास रिंगणात आणून पटेल यांना पाडण्याची रणनीती आखली. ती यशस्वी व्हायला हरकत नव्हती, पण राजकारणातील पुरुषाचे भाग्यही नेहमीच पेंड खाते असे नाही. देशभरातील सध्याचा भाजप विजय हे जसे भाग्य आहे तसे पटेलांचा विजय हे त्यांचे भाग्यच म्हणावे लागेल. राज्यसभा निवडणुकीचे मतदान खुल्या पद्धतीने होत असते व येथे घोडेबाजारास वाव नाही हा भ्रम गुजरात निवडणुकीने तोडला आहे. पक्षांतर बंदीच्या शृंखला तोडून मतदान करणाऱयांनी निर्लज्जतेचे सर्व बांध तोडले. एखाद् दुसऱया भाजप समर्थकांनी अहमद पटेल यांना मतदान केले (असे म्हणतात) व दोन काँग्रेस आमदारांनी मतपत्रिकेवर भाजपलाच मतदान केल्याचे दाखवून पटेल यांचा विजय पक्का केला. पक्षादेश झुगारल्यामुळे त्या दोघांची मते बाद ठरवून घेण्यात काँग्रेसचे कायदेपंडित यशस्वी झाले. दोन्ही बाजूंचे संसदीय कायदेपंडित रात्रीपर्यंत निवडणूक आयोगात जाऊन लढे देतात व जय-विजयासाठी कायद्याचा कीस काढतात हे सर्वसामान्यांसाठी व राष्ट्रासाठी कधी घडेल काय? देश संकटात असताना सत्ताधारी व विरोधक गुजरातच्या एका राज्यसभा जागेसाठी

एकमेकांवर तलवारी

चालवतात व देशाच्या उत्तर सीमा दुश्मनांच्या आक्रमणाने घायाळ होऊन हा तमाशा पाहतात. हे राजकारण किळस आणणारे आहे, पण ‘हमाम में सब नंगे’ अशीच सध्या स्थिती असल्याने दोष तरी कोणाला द्यायचा? पंतप्रधान मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू केले आहे. जनतेमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढू लागली आहे हे या अभियानाचेच एक यश मानावे लागेल. रस्त्यावर थुंकणे, कचरा फेकून अस्वच्छता करणे वगैरे गोष्टींसाठी या अभियानांतर्गत दंड आकारला जातो. ही चांगलीच गोष्ट आहे. पण सध्या ज्या पद्धतीने राजकारणात कचरा टाकला जात आहे तोदेखील दूर करायला हवा. हा कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, या मताचे आम्ही आहोत. शेवटी राजकारणाचा गढूळ झालेला प्रवाहदेखील स्वच्छ झाला तरच खऱया अर्थाने ‘स्वच्छ भारत अभियान’ यशस्वी झाले असे म्हणता येईल. गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीत पटेल यांना पाडण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग आणि काळ्या पैशांचा अमाप वापर झाला या आरोपांत तथ्य असेल तर मग देशात स्वच्छ काय झाले? डबकी तशीच आहेत व सगळ्यांचाच विहार याच डबक्यांत सुरू आहे. हिंदुस्थानातील डोक्यांची डबकी झाल्याची खबर चीनला असल्यानेच कश्मीरमध्ये सैन्य घुसवण्याच्या धमक्या चीन देत असावा. गुजरातच्या राज्यसभा निवडणुकीसाठी दोन्ही बाजूंनी लावलेली ताकद हे आपल्या लोकशाहीतील आश्चर्यच आहे. ही एवढी ताकद डोकलामला लावली असती तर चिनी सैन्याने एव्हाना माघार घेतली असती.

आपली प्रतिक्रिया द्या