गुजरात सरकारने निधी न दिल्याने जगातील दुसरा सर्वांत उंच बुद्ध पुतळा उभारणी प्रकल्प रेंगाळला

1142

गुजरातमधील सांबरकाठा जिल्ह्यात भगवान गौतम बुद्ध यांचा जगातील दुसरा सर्वांत उंच पुतळा उभारण्याच्या गुजरात सरकारच्या प्रकल्पाच्या कामात अद्यापि कोणतीही प्रगती झालेली नाही. सांबरकाठा जिह्यातील देवनी मोरी येथे भव्य बुद्ध पुतळा उभारून या ठिकाणाला आंतरराष्ट्रीय स्थळ करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

चीनमधील प्रिंग टेम्पलमध्ये 153 मीटर उंचीचा बुद्धांचा पुतळा उभारण्यात आला आहे. सांबरकाठा जिल्ह्यात 108 मीटर उंचीचा बुद्ध पुतळा उभारण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. थायलंड येथील बुद्ध पुतळा 92 मीटरचा आहे. त्यापेक्षा अधिक उंचीचा पुतळा उभारण्याची सरकारची योजना आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च 1200 कोटी रुपये आहे.

राज्य सरकारने देवनी मोरी येथे मोठा प्रकल्प प्रस्तावित केला आहे, मात्र अद्यापि निधी मंजूर केलेला नाही. आम्ही निधीसाठी संघर्ष करीत आहोत, लवकरात लवकर पुतळा उभारणीचा आमचा प्रयत्न आहे, असे संघकाया फाऊंडेशन या बुद्ध संघटनेचे अध्यक्ष प्रशीलरत्न गौतम यांनी सांगितले. गुजरात विद्यापीठात आयोजित तीनदिवसीय चौथ्या आंतरराष्ट्रीय बुद्ध परिषदेसाठी जगभरातून 129 बौद्ध भिक्खू आले आहेत. या कार्यक्रमादरम्यान बोलताना गौतम यांनी प्रकल्प उभारणीची माहिती दिली. बुद्ध पुतळ्यासाठी निधी देण्यास सरकारला काही अडचण असेल असे आम्हाला वाटत नाही. सरकारने या प्रकल्पाला नकार दिलेला नाही, मात्र सरकार या प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर नेत नाही असे गौतम म्हणाले.

– 1960 ते 1963 दरम्यान देवनी मोरी येथे राज्य पुरातत्त्व खात्याने उत्खनन केले होते. तेथे तिसऱया आणि चौथ्या शतकातील बौद्ध मठाचे अवशेष आढळले आहेत. सुमारे 1700 वर्षे जुने असलेले हे अवशेष वडोदरातील महाराजा सयाजीराव विद्यापीठात ठेवले आहेत.

– संघकाया फाऊंडेशनने गांधीनगर जिल्ह्यातील अलुवा गावात 80 ते 120 मीटर उंचीचा भगवान बुद्ध यांचा पुतळा उभारणीसाठी भूखंड शोधला आहे. गांधीनगरच्या जिल्हाधिकाऱयांनी साबरमती नदीकाठी पुतळ्यासाठी भूखंड निश्चित केला आहे. आम्हाला तेथे 80 ते 120 मीटरचा बुद्ध पुतळा उभारायचा आहे, असे प्रशीलरत्न गौतम यांनी सांगितले. सध्या संघकाया फाऊंडेशनने गुजरात विद्यापीठाला 5 फूट उंचीचा बुद्ध पुतला भेट दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या