धक्कादायक! उच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेची सासऱ्याविरोधात विनयभंगाची तक्रार

गुजरात उच्च न्यायालयात काम करणाऱ्या एका महिला वकिलाने आपला पती, सासरा आणि सासरच्याविरोधात गांधीनगरमधील अदलाज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सासरच्यांनी हुंड्यासाठी आपला छळ केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. तसेच सासऱ्याने आपला विनयभंग केल्याची तक्रारही तिने दाखल केली आहे. सासरच्याविरोधात महिला वकिलाने खळबळजनक आरोप केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

या महिलेचे लग्न हिम्मतनगरमधील व्यावसायिकाशी 2016 मध्ये झाले होते. तिच्या नवऱ्याचा प्लॅस्टिकचा व्यवसाय असून सासरा एका कोऑपरेटिव्ह बँकेत मोठ्या पदावर कार्यरत आहे. सासरचे सर्वजण आर्थिकदृष्ट्या संपन्न असूनही हुंड्यासाठी आपला छळ करण्यात आल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. नवीन फ्लॅट आणि कार घेण्यासाठी सासरचे आपल्यामागे तगादा लावत असल्याचेही तिने म्हटले आहे. तसेच सासऱ्यांनी आपला विनयभंग केल्याचेही तिने म्हटले आहे. आपण बाथरुमला जात असताना सासरे नेहमी आपल्यामागे येत होते. तसेच आपले अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंगच्या धंद्यात सहभागी होण्यासाठी दबाव टाकत असल्याचा खळबळजनक आरोपही तिने केला आहे. हिंमतनगरमधील एका आमदाराला ब्लॅकमेल करण्याबाबत त्यांनी तिला सांगितले होते. तिने हे करण्यास नकार दिल्यावर सासऱ्यांनी विनयभंग केल्याचा आरोप तिने केला आहे.

महिलेने या घटनेबाबत पतीला माहिती दिल्यावर त्याने तिला मारहाण केली आणि निघून जाण्यास सांगितले. आपल्या घरातील सर्वजण उच्चशिक्षित, सुसंस्कृत आणि खुल्या मनोवृत्तीचे आहेत. त्यामुळे तू सांगितलेल्या गोष्टीत तथ्य नसल्याचे पतीने तिला सांगितले. त्यामुळे तिने अखेर अदलाज पोलीस ठाणे गाठून सासरच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या