गुजरातच्या लेडी डॉनविरुद्ध 21 हजार पानांचे आरोपपत्र, 8 जिल्ह्यात खुनाच्या आरोपासह असंख्य गुन्ह्यांची नोंद

2692

गुजरातमध्ये सध्या एका लेडी डॉनने चांगलीच दहशत माजवली आहे. तिच्या विरुद्ध 21 हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या आरोपपत्रात तिच्यावर खुनाच्या आरोपासह असंख्य गुन्ह्याची नोंद आहे.

या लेडी डॉनचं नाव सोनू डांगर असं आहे. गुजरातच्या सत्र न्यायालयात तिच्याविरुद्ध दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारीसाठी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. सोनू गेल्या दहा वर्षांपासून राजकोट, अमरेली, अहमदाबाद, सूरत, भावनगर, पाटण, जूनागढ आणि गीर-सोमनाथ अशा भागांमध्ये आपली दहशत पसरवून आहे. या दरम्यान तिने अनेक संघटित गुन्हे केले आहेत. यात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारहाण, शस्त्रांची अवैध तस्करी, गोळीबार, मद्यपान, धार्मिक भावना दुखावणे अशा अनेक गुन्ह्यांचा समावेश आहे.

तिची गुन्हे करण्याची पद्धत वैशिष्ट्यपूर्ण आहे, असं निरीक्षण पोलिसांनी नोंदवलं आहे. तंत्रज्ञान हाताळण्यात प्रगत असलेली सोनू ट्विटर आणि अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून ती धमकावणे, पाळत ठेवणे अशी कामं करते. डिसेंबर 2019मध्ये तिला मुस्लीम समाजाच्या भावना दुखावणारी विधानं केल्यामुळे पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर सोनू गायब झाली होती. ती राजकोटमधून परागंदा होऊन उत्तर प्रदेशमध्ये राहून गुन्हे घडवत होती. तिला पुन्हा अटक करण्यात आली असून सध्या ती बडोदा कारागृहात आहे.

सगळ्या कामांमध्ये तिला साथ देणारा मुन्ना नावाच कुख्यात गुंडही सध्या पोलिसांच्या निशाण्यावर आहे. मुन्ना अवैध शस्त्रसाठा आणि स्फोटकांचा साठा करण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. त्याच्यासोबत मिळून तिनेही अनेक गुन्हे केले आहेत. सोनू डांगर हिचं मूळ नाव उषा चंदुभाई डांगर असं आहे. नवनवीन फॅशन ट्रेंड्सची आवड असलेली सोनू एकेकाळी उत्तम नर्तकी होती. त्यानंतर काही प्रतिकूल परिस्थितीमुळे ती गुन्हेगारी विश्वात ओढली गेली, अशी माहिती मिळत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या