पंतप्रधानांच्या नावाने गुजराती महाठगाचा ‘झेडप्लस’ कारनामा

पंतप्रधानांच्या नावाने एका गुजराती महाठगाने ‘झेडप्लस’ कारनामा केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. गुजरातच्या किरण भाई पटेल याने आपण पंतप्रधान कार्यालयाचा अतिरिक्त संचालक असल्याचे सांगत जम्मू-कश्मीरमध्ये झेडप्लस सुरक्षा आणि बुलेटप्रुफ गाडी दिमतीला मिळवली होती. मात्र संबंधित व्यक्ती बोगस अधिकारी निदर्शनास आल्याने पोलिसांनी त्याला अटक केली होती. दहा दिवसांच्या या घटनेबाबत पोलिसांनी गुप्तता पाळली होती. किरण पटेल याने फेब्रुवारी महिन्यातही जम्मू कश्मीरचा दौरा केला होता. तेव्हा त्याने गुजरातमधून जास्तीत जास्त पर्यटक कसे आणता येतील याबाबत अधिकाऱयांची बैठक घेतली होती. तेव्हा संशय आल्याने जम्मू कश्मीर पोलिसांच्या गुप्तचर विभागाने पोलिसांना अलर्ट केले. यानुसार पुन्हा जम्मू कश्मीरच्या दौऱयावर आलेल्या पटेलच्या हालचालीवर पोलिसांनी नजर ठेवली. तो बोगस अधिकारी असल्याचे समोर येताच त्याला अटक केली होती.