आईला उन्हात बसवायला गेला आणि इमारतीवरुन खाली ढकलून आला

41

सामना ऑनलाईन । राजकोट

गुजरातमधील राजकोट शहरात एका तरूणाने त्याच्या आजारी आईला इमारतीच्या छतावरून ढकलून तिची हत्या केली आहे. याप्रकरणी त्या नराधम मुलाला पोलिसांनी अटक केली असून त्याने आईच्या सततच्या आजारपणाला कंटाळून तिची हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. संदीप नाथवानी असे त्या मुलाचे नाव असून तो एका कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे.

संदीपची आई जयश्रीबेन विनोदभाई नाथवानी या गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी होत्या. पायाच्या शस्त्रक्रियेमुळे त्या चालू शकत नव्हत्या. त्यामुळे संदीप त्याच्या बायकोला त्यांचे सर्व जागेवरच करावे लागत होते. नेहमीच्या या आजारपणाला कंटाळून संदीपने त्याच्या आईला मारण्याची योजना आखली. त्यानुसार २७ सप्टेंबर रोजी तो आईला चालता येत नसतानाही जबरदस्ती खेचत इमारतीच्या टेरेसवर घेऊन गेला. तेथून त्याने आईला खाली ढकलून दिले. यात जयश्रीबेनचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणात संदीपने सुरूवातीला आईने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा बनाव रचला. पोलिसांनाही यात तथ्य वाटल्याने या प्रकणाची फाईल बंद करण्यात आली.

या घटनेच्या तीन महिन्यानंतर संदीपला त्याचा गुन्हा पचला असे वाटत असतानाच पोलिसांना जयश्रीबेनने आत्महत्या केली नसून हत्या केली असल्याची माहिती देणारे पत्र आले. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा याप्रकरणाचा तपास सुरू केला. तेव्हा पोलिसांनी इमारतीतीचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यात हत्येच्या दिवशी संदीप त्याच्या आईला जबरदस्ती इमारतीच्या टेरेसवर घेऊन जात असल्याचे दिसले. याबाबत संदीपची चौकशी केली असता. संदीपने तो आईला उन्हात बसवायला घेऊन गेलो होतो. पण मी जेव्हा परत गेलो तेव्हा आईने आत्महत्या केल्याचे सांगितले.

मात्र पोलिसांनी जयश्रीबेन यांचे वैद्यकीय रिपोर्ट तपासले असता व त्यांच्या डॉक्टरांची चौकशी केली असता, त्या पायावर शस्त्रक्रीया झाल्याने त्या चालू शकत नसल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी संदीपला ताब्यात घेत पुन्हा त्याची कसून चौकशी केली. तेव्हा संदीपने त्याचा गुन्हा कबूल केला. याप्रकरणी पोलिसांनी संदीप व त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या पत्नीने संदीपच्या गुन्ह्यात साथ दिल्याने तिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या