गुजरातः मतदान यंत्रामधील मते मोबाईलने बदलली जात आहेत?

29

सामना ऑनलाईन । पोरबंदर

गुजरातमध्ये विधानसभेच्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी वापरलेल्या मतदान यंत्रामधील (ईव्हीएम) मते मोबाईलद्वारे बदलली जात असल्याचा संशय काँग्रेसने व्यक्त केला आहे. पोरबंदर जिल्ह्यातील ठक्कर प्लॉट बूथ येथे मोबाईलचे ब्लूटूथ सुरू करताच तिथल्या मतदान यंत्राचे नाव मोबाईलमध्ये दिसले. हा प्रकार लक्षात येताच काँग्रेस नेते अर्जुन मोढवाडिया यांनी आपल्या मोबाईलचा स्क्रीनशॉट घेऊन तो निवडणूक आयोगाला पाठवून दिला. काँग्रेसच्या तक्रारीची दखल घेऊन निवडणूक आयोगाने आपल्या अभियंत्यांना घटनास्थळी पाठवले.

pic

पहिल्या टप्प्याच्या मतदानादरम्यान २४ हजार ६८९ मतदान यंत्रांपैकी १ टक्क्यापेक्षा जास्त यंत्र बदलण्यात आली आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली. राज्याच्या विविध भागांतून मतदान यंत्रांविषयीच्या तक्रारी आल्या आहेत. तक्रारी येताच लगेच दखल घेऊन यंत्र बदलण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. पोरबंदर, सुरत, वलसाड, सौराष्ट्रमधील अनेक मतदान केंद्रांमधील मतदान यंत्र बदलली आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली.

काँग्रेसने आधीच मतदान यंत्रात गडबड केली जाण्याची शक्यता व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घडामोडींमुळे पुन्हा एकदा मतदान यंत्रांविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र सत्ताधारी भाजपने काँग्रेसचे आरोप फेटाळले आहे. गुजरातमध्ये १८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निकालाच्या दिवशी दारुण पराभव झाल्यानंतर कारणं देणे सोपे व्हावे म्हणून काँग्रेस आधीपासून पार्श्वभूमी तयार करत आहे, असे भाजपने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या