गुजरातः पहिल्या टप्प्यात ६८ टक्के मतदान

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे पहिल्या टप्प्याचे मतदान पूर्ण झाले. सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधील १९ जिल्ह्यांमधल्या ८९ जागांसाठी मतदान झाले. दिवसभरात ६८ टक्के मतदान झाले. सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली आणि संध्याकाळी ५ वाजता मतदान संपले. काही ठिकाणचे आकडे यायचे आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्याच्या मतदानाची टक्केवारी २०१२च्या पहिल्या टप्प्यातील मतदानाचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये २०१२मध्ये झालेल्या निवडणुकीच्यावेळी पहिल्या टप्प्यात ७०.७५ टक्के मतदान झाले होते.

गुजरातः मतदान यंत्रामधील मते मोबाईलने बदलली जात आहेत?

मतदान झाले आणि ८९ जागांवर उभ्या असलेल्या ९७७ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांमध्ये बंद झाले. मतदानाचा दुसरा टप्पा १४ डिसेंबरला आहे. मतमोजणी १८ डिसेंबरला होणार आहे. दिव्यांगासाठी सुगम आणि महिलांसाठी सखी योजना राबवण्यात आली. मतदारांना सहजतेने मतदान केंद्रांवर पोहोचता यावे आणि झटपट मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाने चांगली व्यवस्था केली होती. या व्यवस्थेमुळे मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. मतदानाचे डिजिटल मॅपिंग करण्यात आले आहे, असेही निवडणूक आयोगाने सांगितले.

कच्छ, मोरबी, जामनगर, सुरेंद्रनगर, देवभूमी, द्वारका, राजकोट, बोटाद, पोरबंदर, जुनागड, अमरेली, गिर सोमनाथ, भावनगर, भरुच, नर्मदा, सुरत, तापी, नवसारी, डांग आणि वलसाड या जिल्ह्यांमध्ये मतदान झाले. तब्बेल २.१२ कोटी मतदारांच्या या भागात सत्ताधारी भाजप आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने विजयासाठी ताकद पणाला लावली होती.

पहिल्या टप्प्याच्या मतदानादरम्यान २४ हजार ६८९ मतदान यंत्रांपैकी १ टक्क्यापेक्षा जास्त यंत्र बदलण्यात आली. पोरबंदर जिल्ह्यातील ठक्कर प्लॉट बूथ येथे मोबाईलचे ब्लूटूथ सुरू करताच तिथल्या मतदान यंत्राचे नाव मोबाईलमध्ये दिसले. हा प्रकार लक्षात येताच काँग्रेस नेते अर्जुन मोढवाडिया यांनी आपल्या मोबाईलचा स्क्रीनशॉट घेऊन तो निवडणूक आयोगाला पाठवून दिला.

आपली प्रतिक्रिया द्या