राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा

‘सर्व चोरांची आडनावे मोदी कशी असतात?’ असे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात केले होते. याप्रकरणी दाखल झालेल्या मानहानी खटल्यात गुजरातमधील सुरत जिल्हा व सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यानंतर तातडीने जामीन मंजूर केला आणि शिक्षेला 30 दिवसांची स्थगिती दिली आहे. दरम्यान, या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले असून, काँग्रेस पक्ष उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे.

2019च्या लोकसभा निवडणूक प्रचारावेळी कर्नाटकात कोलार येथील सभेत बोलताना सर्व चोरांची आडनावे मोदी कशी काय असतात? असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता. या वक्तव्यावरून गुजरातमधील भाजप आमदार पुर्णेश मोदी यांनी त्यांच्याविरुद्ध सुरत सत्र न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधींनी संपूर्ण मोदी समुदायाचा अपमान केल्याचे पुर्णेश मोदी यांनी याचिकेत म्हटले होते.

राहुल गांधी न्यायालयात हजर

आज सुरत जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयात राहुल गांधी हजर होते. तेव्हा सत्र न्यायाधीश एच. एच. वर्मा यांनी तुम्हाला काही मत मांडायचे आहे का? असे राहुल गांधींना विचारले. त्यावर ‘मी सातत्याने भ्रष्टाचाराविरोधात बोलतो. मी कोणाविरुद्ध जाणूनबुजून बोललेलो नाही. त्यामुळे कोणाचे नुकसान झाले नाही’, असे राहुल गांधी म्हणाले. त्यानंतर न्यायाधीश वर्मा यांनी निकाल देताना आयपीसी कलम 499 आणि 500 अंतर्गत दोषी ठरवत राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच काही वेळात शिक्षेला 30 दिवसांची स्थगिती दिली आणि जामीन मंजूर केला.

हुकूमशाही भाजप सरकार घाबरले – खरगे

राहुल गांधी आणि विरोधी पक्षांकडून सरकारच्या गैरकारभाराचा पर्दाफाश करून ‘जेपीसी’ची मागणी केली जात आहे. त्यामुळे हुकूमशाही भाजप सरकार घाबरले आहे. राजकीय भाषण करणाऱयांकडे मोदी सरकारकडून ईडी, पोलीस पाठवून गुन्हे दाखल केले जातात. ही तर राजकीय दिवाळखोरीच आहे. सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध काँग्रेस पक्ष उच्च न्यायालयात अव्हान देणार, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधी कायदा काय म्हणतो…

लोकप्रतिनिधी कायदा 1951, कलम 8(3) नुसार जेव्हा एखाद्या आमदार, खासदाराला दोन वर्षे आणि त्यापेक्षा जास्त कालावधीची शिक्षा सुनावली जाते तेव्हा त्याच दिवशी त्याचे सभासदत्व रद्द होऊन सहा वर्षे निवडणूक लढविण्यास बंदीची तरतूद लागू होते. परंतु या प्रकरणात राहुल गांधी यांच्या शिक्षेला सत्र न्यायालयाने 30 दिवसांची स्थगिती दिली आहे. या काळात ते उच्च न्यायालयात अपील करतील. त्यामुळे राहुल गांधींच्या खासदारकीला सध्या कोणताही धोका नाही, असे ज्येष्ठ घटनातज्ञ सुभाष कश्यप यांनी सांगितले.

माझा भाऊ घाबरणारा नाही ः प्रियंका

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी पेंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘हे घाबरलेले सरकार साम, दाम, दंड आणि भेद वापरून राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पण माझा भाऊ कधी घाबरला नाही आणि यापुढेही घाबरणार नाही. तो सत्य बोलत आला आहे आणि सत्य बोलतच राहणार. देशातील जनतेचा आवाज बुलंद करत राहू. कोटय़वधी देशवासीयांचे प्रेम राहुल गांधींच्या पाठीशी आहे’, असे प्रियंका गांधींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

सत्य हाच माझा देव

न्यायालयाच्या निकालानंतर राहुल गांधींनी ट्विट करीत महात्मा गांधी यांचे एक वाक्य शेअर केले आहे. ‘माझा धर्म सत्य आणि अहिंसेवर आधारित आहे. सत्य हाच माझा देव आहे आणि अहिंसा हे साधन आहे’, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.