
आयपीएल सोळाचा पहिला दिवस गतविजेत्या गुजरात जायंट्ससाठी शुभ ठरला. शुभमन गिलच्या 63 धावा आणि मधल्या फळीतील फलंदाजांच्या छोटय़ा पण उपयुक्त खेळींच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जचा 5 विकेट्स आणि 4 चेंडू राखून पराभव केला.
चेन्नईच्या 179 धावांचा पाठलाग करताना गुजरातला शुभमन आणि वृद्धिमान साहाने 37 धावांची सलामी दिली. त्यानंतर शुभमनने 36 चेंडूंत 63 धावा ठोकत गुजरातला विजयपथावर आणले. मग मधल्या फळीतील विजय शंकर, राहुल तेवतिया आणि राशिद खानने दमदार खेळ करीत 4 चेंडूआधीच विजयावर शिक्कामोर्तब केले,
त्याअगोदर ऋतुराज गायकवाडच्या 50 चेंडूंतील 92 धावांच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने 7 बाद 178 धावा केल्या. त्याने या खेळीत 9 षटकार आणि 4 चौकारांचा वर्षाव केला. त्याच्या झंझावातामुळे चेन्नई 200-225 धावांचा टप्पा सहज गाठेल असे वाटत होते, पण अझारी जोसेफने मोक्याच्या क्षणी अचूक मारा करीत चेन्नईच्या फलंदाजांना जखडून ठेवले. त्यामुळे ऋतुराज आणि चेन्नईच्या धावांचा वेग मंदावला. त्यामुळे चेन्नईला 178 धावांपर्यंत मजल मारता आली. चेन्नईच्या डावात मोईन अलीचा (23) अपवाद वगळता एकालाही धावांची विशी ओलांडता आली नाही.
संक्षिप्त धावफलक – चेन्नई – 20 षटकांत 7 बाद 178 (ऋतुराज गायकवाड 92, मोईन अली 23, शिवम दुबे 19 ; शमी 4-029-2, राशिद खान 4-0-36-3, अलझारी जोसेफ 4-0-33-3). गुजरात जायंट्स – 19.2 षटकांत 5 बाद 182 (वृद्धिमान साहा 25, शुभमन गिल 63, साई सुदर्शन 22, विजय शंकर 27 ; हंगर्गेकर 4-0-36-3).