गुजरातमध्ये भाजपने भाकरी फिरवली! रुपाणी मंत्रिमंडळातील सर्वांना डच्चू

गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांच्याकडे जबाबदारी सोपवत भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने राज्यातील प्रस्थापीतांना धक्का दिला. त्यापाठोपाठ माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना डच्चू देत 24 नव्या मंत्र्यांची टीम तयार केली आहे. गुजरातमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने सत्तेची भाकरी फिरविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा बुधवारी दुपारी होणार होता. मात्र, मंत्रिमंडळात करण्यात येणाऱ्या फेरबदलावरून माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी नाराजी व्यक्त केल्याने हा सोहळा पुढे ढकलण्यात आला होता. गुरुवारी दुपारी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी त्यांची टीम जाहीर केली. राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात 24 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये 10 कॅबिनेट आणि 14 राज्यमंत्री आहेत. विशेष म्हणजे रुपाणी यांच्या मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्याला स्थान देण्यात आलेलं नाही.

विधानसभा अध्यक्षही बदलले

मुख्यमंत्री आणि फक्त मंत्रिमंडळच नाही तर भाजपने गुजरातमध्ये विधानसभा अध्यक्षांना हटवलं आणि त्यांच्या जागी नव्या अध्यक्षांना बसवलं आहे. 2017 पासून गुजरात विधानसभेचे अध्यक्ष असणाऱ्या राजेंद्र त्रिवेदी यांनी गुरुवारी राजीनामा दिला होता. नव्या मंत्रिमंडळात त्यांचा कॅबिनेट मंत्रीपद म्हणून समावेश करण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणून निमा आचार्य यांची निवड केली आहे.

नाराजी व्यक्त करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता

माजी मुख्यमंत्री रुपाणी आणि माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल गुजरातमधील नव्या मंत्रिमंडळाबाबत नाराज होते. यामुळे बुधवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत आमदार आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू होते. यानंतर, नाराज नेत्यांचे मन वळवण्याची जबाबदारी रुपाणी यांच्यावर सोपवविण्यात आली होती. अखेर ज्यांनी नाराजी व्यक्त केली त्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला.

या मंत्र्यांनी घेतली शपथ

कॅबिनेट मंत्री -राजेंद्र त्रिवेदी, जितू वाघानी, ऋषिकेश पटेल, पूर्णेश मोदी, राघव पटेल, कनुभाई देसाई, किरीट सिंह राणा, नरेश पटेल, प्रदीप सिंह परमार, अर्जुन सिंह चव्हाण.

राज्यमंत्री – हर्ष सांघवी, जगदीश पांचाल, बृजेश मेरजा, जीतू चौधरी, मनीषा वकील, मुकेश पटेल, निमिषा बेन, अरविंद रैयाणी, कुबेर ढिंडोर, कीर्ती वाघेला, गजेंद्र सिंह परमार, राघव मकवाणा, विनोद मरोडिया, देवा भाई मालम.

आपली प्रतिक्रिया द्या