गुजरात भाजपमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावरून बंडाचे वारे; विजय रूपाणी, नितीन पटेल, भूपेंद्रसिंह चुडासमा नाराज

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून दोन दिवसांपूर्वी भूपेंद्र पटेल यांनी शपथ घेतली खरी, पण मंत्रिमंडळ विस्तारावरून गुजरात भाजपमध्ये बंडाचे वारे वाहू लागले आहेत. मंत्रिमंडळात करण्यात येणाऱया फेरबदलावरून माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल, माजी मंत्री भूपेंद्र सिंह चुडासमा नाराज असल्याचे बोलले जातेय.

bhupendra-patel-meeting-netin-patel

पुढील वर्षी होणाऱया विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना संपूर्ण मंत्रिमंडळ बदलायचे आहे. मांत्रिमंडळाचा गुरुवारी दुपारी दीड वाजता शपथविधी होणार असून सर्व 27 मंत्री नवीन चेहरे आहेत. त्यात महिलांनाही संधी देण्यात आली आहे.

मनधरणीसाठी तीन तास बैठक

नाराज नेत्यांचे मन वळण्याची जबाबदारी भाजपने राष्ट्रीय संघटन महामंत्री बी. एल. संतोष आणि गुजरात भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यावर सोपवली आहे. या दोन्ही नेत्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा केली. यानंतर नितीन पटेल आणि भूपेंद्र सिंह या दोघांशी किमान दीड तास चर्चा केली. पण नाराजांची मनधरणी करण्यात त्यांना फारसे यश आले नाही. माजी मंत्री कौशिक पटेल आणि पुरुषोत्तम रूपालाही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीस उपस्थित होते.

bhupendra-patel-becomes-chief-minister

नाराज नितीन पटेल काँग्रेसच्या संपर्कात

मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराज असणारे माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल हे काँग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. मंगळवारी रात्री त्यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला यांची भेट घेतली. दोघांमध्ये दीर्घकाळ चर्चा झाली. नितीन पटेल यांची नाराजी ही पहिल्यांदाच नाही. 2016 मध्ये अर्थ मंत्रालय न मिळाल्याने ते नाराज झाले होते. अखेर पक्ष नेतृत्वाला त्यांचे म्हणणे ऐकून घेत उपमुख्यमंत्री पदासोबत अर्थमंत्रीपदही द्यावे लागले होते.

आपली प्रतिक्रिया द्या