जन्मताच मातृछत्र हरवलेल्या बालिकेला महिला न्यायाधिशाने केले स्तनपान, घेतले दत्तक

सामना ऑनलाईन। अहमदाबाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेटी बचाओ-बेटी पढाओ या अभियानाला गुजरातचे जिल्हा विकास अधिकारी आणि त्यांच्या न्यायाधीश पत्नीने प्रत्यक्षात उतरवून समाजासमोर वेगळा आदर्श ठेवला आहे. जन्माच्या 15 दिवसांनंतर मातृछत्र हरवलेल्या एका नवजात बालिेकेला या दांपत्याने दत्तक घेतले आहे.

गुजरातमधील आनंद जिल्हयाचे विकास अधिकारी अमित प्रकाश यादव यांना एका महिलेची प्रसूती झाल्याचे व तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजले होते. तसेच महिलेला पुढील उपचारासाठी एसएसजी रुग्णालयात हलवणे गरजेचे होते. पण त्याआधीच महिलेचा मृत्यू झाला. यामुळे यादव यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यावेळी महिलेची 14 दिवसांची नवजात बालिका भुकेने व्याकूळ होऊन टाहो फोडत असल्याचे त्यांना दिसले. हे दृश्य बघून अमित व्यथित झाले. त्यांनी घरी येताच न्यायाधिश असलेल्या पत्नी चित्राला याबद्दल संगितले. त्यानंतर दोघे पती पत्नी पुन्हा रुग्णालयात गेले. तिथे गेल्यावर चित्रा यांनी त्या बालिकेला स्तनपान केले. नंतर बालिकेच्या वडीलांची भेट घेत त्यांनी मुलीला दत्तक घेण्याची इच्छा त्यांच्यापुढे व्यक्त केली. मुलीच्या भवितव्याचा विचार करत तिच्या वडिलांनीही त्यास होकार दिला . आता बालिकेला दत्तक घेण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे यादव यांनी सांगितले आहे. यादव दांपत्याला दीड वर्षांचा एक मुलगाही आहे.

आपली प्रतिक्रिया द्या