गुजरातचे ड्रग्ज कनेक्शन पुन्हा उघड, विमानतळ कुरिअर टर्मिनसमधून चार कोटींचे हेरॉईन जप्त

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) सहार येथील आंतरराष्ट्रीय कुरिअर टर्मिनस येथे कारवाई करून सुमारे चार कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले आहे. जप्त केलेले हेरॉईन हे अफगाणिस्तान-दक्षिण आफ्रिका व्हाया मुंबईत बॅगेत लपवून पाठवले  होते. हेरॉईन तस्करी प्रकरणी एनसीबीने वडोदरा येथे राहणाऱ्या क्रिष्णा मुरारी प्रसादची कसून चौकशी केली.

सहार कुरिअर टर्मिनसवर परदेशातून एक पार्सल आले असून त्यात हेरॉईन असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. त्या माहितीनंतर दोन दिवसांपूर्वी एनसीबीच्या पथकाने कुरिअर टर्मिनसमध्ये जाऊन पाहणी केली. तेथून एनसीबीने एक पार्सल जप्त केले. त्या पार्सलच्या आत एक बॅग होती. त्या बॅगेमध्ये ते हेरॉईन लपवले होते. एनसीबीने कारवाई करून 700 ग्रॅम हेरॉईन जप्त केले. जप्त केलेल्या हेरॉईनची किंमत चार कोटी रुपये इतकी आहे.

हेरॉईन प्रकरणी एनसीबीने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासा दरम्यान ते पार्सल वडोदरा येथे राहणाऱ्या प्रसादचे असल्याचे उघड झाले. एनसीबीने प्रसादला नोटीस देऊन चौकशीला बोलवले. प्रसाद हे आज एनसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी आले होते. रात्री उशिरापर्यंत प्रसादची एनसीबीचे अधिकारी चौकशी करत होते. जप्त केलेले हेरॉईन हे अफगाणिस्थान-दक्षिण आफ्रिका व्हाया मुंबई आले होते. ते हेरॉईन बीट कॉईनच्या माध्यमातून खरेदी केले गेले होते का याचा तपास एनसीबी करत आहेत.