गुजरातमध्ये धो धो पैसा मतदानाआधी सापडले 290 कोटींचे घबाड

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवार, 1 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने केलेल्या विशेष कारवाईत रोख रक्कम, दारू, मोफत भेटवस्तू असा एकूण 290 कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर एवढा मोठा मुद्देमाल सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान 1 डिसेंबरला होणार आहे. पहिल्या टप्प्यात 19 जिह्यांतील 89 जागांसाठी एकूण 2,39,76,670 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या टप्प्यात एकूण 788 उमेदवार रिंगणात आहेत. त्यांचे भवितव्य 1 डिसेंबरला ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.या पार्श्वभूमीवर, पोलीस तसेच इतर यंत्रणांच्या मदतीने राज्यभरात केलेल्या कारवाईत निवडणूक आयोगाच्या पथकाने 290 कोटींची मुद्देमाल जप्त केला.

लोकांना भीती न बाळगता मतदान करता यावे, यासाठी सर्व सर्व प्रकारची कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, अशी माहिती गुजरातचे डीजीपी आशीष भाटिया यांनीही दिली.

2017 च्या तुलनेत  10 पटीने अधिक जप्ती   

गुजरात विधानसभा निवडणुकीत 2017 मध्ये एकूण 27 कोटी 21 लाखांचा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या वेळी 29 नोव्हेंबर 2022 पर्यंत एकूण 290 कोटी 94 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्तीची ही रक्कम 2017 मधील जप्तीच्या 10.66 पट आहे. जप्तीची ही कारवाई अजूनही सुरूच आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली.