डॉ. आंबेडकर ब्राह्मण होते, पंतप्रधान मोदीही ब्राह्मण!

373

सामना ऑनलाईन । गांधीनगर

डॉ. आंबेडकर हे ब्राह्मण होते आणि पंतप्रधान मोदी हेही ब्राह्मण आहेत, असं वादग्रस्त विधान गुजरात विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी केलं आहे. तसंच, श्रीकृष्णही ओबीसी होता, ज्याला सांदिपनी ऋषींनी देव बनवलं होतं, असंही त्रिवेदी यांनी म्हटलं आहे. गांधीनगर येथे आयोजित समस्त गुजरात ब्रम्ह समाज या संस्थेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्यांने हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या भाषणावेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेलही व्यासपीठावर उपस्थित होते.

एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, या सभेदरम्यान त्रिवेदी म्हणाले की, ब्राह्मण कधीच सत्तेचे लोभी नव्हते. त्यांनी अनेक राजे घडवले. मी हे नेहमीच सांगत आलो आहे की, ब्राह्मणांनीच अनेकांना देवत्व मिळवून दिलं. श्रीराम हे क्षत्रिय होते, पण ऋषी-मुनींनी त्यांना देव बनवलं. गोकुळात एका गुराख्याला आपण ओबीसी म्हणतो, पण त्या ओबीसीला देव सांदिपनी या ऋषींनी म्हणजे एका ब्राह्मणाने बनवलं. मत्स्यकन्येचा मुलगा असलेल्या व्यासांनाही ब्राह्मणांनीच महत्त्व मिळवून दिलं, असं वक्तव्य त्रिवेदी यांनी केलं.

त्रिवेदी पुढे म्हणाले की, अर्थशास्त्र या ग्रंथाचा लेखक आणि चंद्रगुप्त मौर्याचा गुरू चाणक्य हेही ब्राह्मण होते. त्यांनी मनात आणलं असतं तर ते राजा बनले असते. पण, ब्राह्मण कधीच सत्तेचा लोभी नसतो. तो नेहमीच समाजाच्या भल्याचा विचार करतो. डॉक्टर आंबेडकर हेही ब्राह्मण होते. त्यांच्या ब्राह्मण गुरूंचं आडनाव ते लावत असल्यामुळे ते ब्राह्मण होते. मला हे सांगायला अभिमान वाटतो की आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही ब्राह्मण आहेत. ब्राह्मण समाजाने देशाला पाच राष्ट्रपती, सात पंतप्रधान, ५० मुख्यमंत्री, ५०हून अधिक राज्यपाल, २७ भारतरत्न विजेते आणि सात नोबेल पुरस्कार विजेते दिले आहेत, असंही त्रिवेदी यावेळी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या