गुजरातमध्ये 200 कोटींचे अमली पदार्थ घेऊन येणारी पाकिस्तानी बोट जप्त

पाकिस्तानमधून सागरी मार्गाने गुजरातमध्ये  सुरू असलेली अमली पदार्थांची तस्करी मोठय़ा प्रमाणात सुरूच असून आज सकाळी 200 कोटी रुपयांचे अंमलीपदार्थ घेऊन येणारी पाकिस्तानी बोट जप्त करण्यात आली. भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस)ने ही कारवाई केली. या कारवाईत 6 पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.

पाकिस्तानमधून सागरी मार्गाने गुजरातमध्ये बंदरांमध्ये येणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीचे सत्र सुरू आहे. गुजरातच्या जखाऊ सागरी सीमेत 6 सागरी मैल आत ही पाकिस्तानी बोट शिरली होती. भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांना या बोटीचा सुगावा लागताच दलाच्या दोन स्पीड बोटींनी या बोटीला चारही बाजूंनी घेरले आणि शरण यायला भाग पाडले. दरम्यान, हा साठा गुजरातमध्ये उतरवून रस्ते मार्गाने पंजाबमध्ये घेऊन जाण्यात येणार होता.

गुजरात बनले अंमली पदार्थ तस्करीचे हब 

गेल्या दोन ते तीन वर्षांत गुजरातमधून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांचा साठा बघता गुजरात हा अमली पदार्थ तस्करीचा अड्डा बनला आहे. गुजरातमध्ये 2021 मध्ये 3 हजार 335 किलो हेरोईन जप्त करण्यात आले आहे. हा देशातील आतापर्यंत सर्वात मोठा आकडा आहे. या वर्षी गुजरात, दिल्ली आणि कोलकाता येथे टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये आतापर्यंत 1300 किलोचे तब्बल 6 हजार 800 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.