गतविजेत्या मुंबईचे ४२व्यांदा चॅम्पियन होण्याचे स्वप्न भंगले

73

सामना ऑनलाईन, इंदौर

कर्णधार पार्थिव पटेलच्या नेतृत्वाखाली गुजराजच्या क्रिकेट संघाने शनिवारी इतिहास रचला. रणजीच्या इतिहासात कोणत्याही गुजरातच्या संघाला जे शक्य झाले नाही ते या संघाने करून दाखवले. बलाढय़ अन् गतविजेत्या मुंबईला हरवत गुजरातने हिंदुस्थानातील प्रतिष्ठेचा करंडक पटकावला. यावेळी मुंबईच्या ४२व्यांदा चॅम्पियन होण्याच्या स्वप्नांना सुरुंग लागला. पार्थिवची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

२२१ षटके यष्टिरक्षण… पहिल्या डावात ९० अन् दुसऱ्या डावात १४३ धावांची धाडसी खेळी… आपल्या पहिल्या लिस्ट ए शतकाने ५० षटकांच्या विजय हजारे ट्रॉफीत गुजरातला चॅम्पियन बनवण्यात यश.आणि आता २५ व्या प्रथम श्रेणी शतकाने गुजरातला पहिल्यांदाच रणजी अजिंक्यपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा. ही कहाणी आहे ३१ वर्षीय पार्थिव पटेलची. ज्याच्या जोरावर गुजरातने रणजी चषक उंचावला

मुंबईच्या ३१२ धावांचा पाठलाग करणाऱया गुजरातला सकाळच्या सत्रातील पहिल्याच तासात मुंबईकडून जोरदार झटका मिळाला. बलविंदर संधूने प्रियांक पांचालाला ३४ धावांवर तर भार्गव मेराईला २ धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर मुंबईचा संकटमोचक अभिषेक नायरने समित गोहेलला २१ धावांवर यष्टिरक्षक कर्णधार आदित्य तरेकरवी झेलबाद केले. त्यामुळे 30व्या षटकांत गुजरातची अवस्था ३ बाद ८९ अशी बिकट झाली.

११६  धावांची महत्त्वाची भागीदारी अन् रेकॉर्ड चेस

कर्णधार पार्थिव पटेल व मनप्रीत जुनेजा या जोडीने चौथ्या विकेटसाठी ११६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करीत गुजरातच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या. पार्थीव पटेलने संस्मरणीय खेळी साकारली. सुरुवातीला त्याच्या बॅटला लागून चेंडू स्टम्पच्या आजूबाजूने निघून गेले. स्लिपच्या बाजूनेही गेले. या खेळीत त्याच्या बाजूने नशीब होते एवढं मात्र निश्चित. अखिल हेरवाडकरच्या गोलंदाजीवर मनप्रीत जुनेजा ५४ धावांवर बाद झाला. पार्थिव पटेलने १९६ चेंडूंत २४ चौकारांनिशी १४३ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. या डावामध्ये मुंबईच्या क्षेत्ररक्षकांनी नाहक चुका केल्या, झेल सोडले. याचा फटका त्यांना बसला. गुजरातने या लढतीत रणजीच्या इतिहासातील विक्रमी धावांचा पाठलागही केला. याआधी १९३७-१९३८ सालामध्ये हैदराबादने नवानगरविरुद्ध ३१० धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. त्यानंतर थेट गुजरातने मुंबईचे आव्हान लीलया ओलांडले आहे.

होळकर, दिल्ली, कर्नाटक, हरयाणानंतर…

मुंबई संघाची रणजी स्पर्धेतील कामगिरी तमाम क्रिकेटप्रेमींना चांगलीच ठाऊक आहे. मुंबईने सर्वाधिक ४१व्यांदा ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केलाय. पण या मोसमात या दिग्गज संघाला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागलेय. गुजरातने ५ गडी राखून दिमाखदार विजय मिळवत अगदी रुबाबात जेतेपदाला गवसणी घातली. याचसोबत त्यांनी आणखी एक विक्रमाची नोंद केलीय. मुंबईला फायनलला नमवण्याची किमया पार्थिव पटेलच्या संघाने करून दाखवलीय. याआधी होळकर, दिल्ली, कर्नाटक व हरयाणा या चारच संघांना हे शक्य झाले होते.

प्रियांक पांचालाच्या सर्वाधिक धावा

या रणजी मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा मान गुजरातच्या प्रियांक पांचालाने मिळवलाय. त्याने १०  सामन्यांमधून पाच शतके व चार अर्धशतकांच्या सहाय्याने १३१० धावांची बरसात केली. त्यानंतर हरयाणाच्या नितीन सैनीने ९८९ धावा, हिमाचल प्रदेशच्या प्रशांत चोप्राने ९७८  धावा, दिल्लीच्या रिषभ पंतने ९७२धावा आणि सेनादलच्या राहुल सिंगने ९४५ धावा करीत सर्वोत्तम ५ फलंदाजांच्या यादीत धडक मारली. मुंबईच्या श्रेयस अय्यरने ७२५ धावा फटकावत १६ वे स्थान पटकावले आहे.

महाराष्ट्राचा अनुपम संकलेचा गोलंदाजीत दुसऱया स्थानावर

मुंबई व गुजरात या संघांनी रणजीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला असला तरी या दोन्ही संघांतील गोलंदाजांना मात्र अंतिम गोलंदाजांच्या यादीत अव्वल पाच खेळाडूंच्या यादीत धडक मारता आलेली नाही. झारखंडचा शाहबाज नदीम ५६ बळींसह अव्वल स्थानावर असून महाराष्ट्राचा अनुपम संकलेचा हा ४३ बळींसह दुसऱया स्थानावर आहे. त्यानंतर हैदराबादच्या मोहम्मद सिराजने ४१ बळींसह तिसरे, राजस्थानच्या पंकज सिंगने ४१ बळींसह चौथे व गोव्याच्या शादाब जाकतीने ४१ बळींसह पाचवे स्थान पटकावले आहे. गुजरातकडून सर्वाधिक बळी गारद करण्याची करामत रुश कलेरियाने केलीय. त्याने २८ बळी गारद केले आहेत. तसेच मुंबईकडून विजय गोहीलने २७ फलंदाज बाद केलेत.

Attachments area

आपली प्रतिक्रिया द्या