महापालिकेत भाजपची सत्ता येताच प्रशासनाला गुजरातीचा पुळका

48

श्रीरामकुंडावर गुजराती भाषेतील सूचना फलक

सामना ऑनलाईन, नाशिक –

मुंबईपाठोपाठ नाशिक महापालिका प्रशासनालाही गुजराती भाषेचा पुळका आला आहे. दक्षिण काशी नाशिकच्या पवित्र गोदावरी नदीवरील श्रीरामकुंडावर गुजराती भाषेतील सूचना फलक इतिहासात पहिल्यांदाच झळकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

नाशिक महापालिका निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेणार असल्याची घोषणा केली होती. महापालिकेत भाजपाला स्पष्ट बहुमत प्राप्त होताच प्रशासन खडबडून जागे झाले आहे. भाजपा सरकारला खूष करण्यासाठी प्रशासन गतिमान झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नाशिकच्या पवित्र गोदावरी नदीवरील श्रीरामकुंडावर पापक्षालनासाठी देशभरातीलच नव्हे तर जगभरातून भाविक येतात. हे महत्व लक्षात घेऊन प्रशासनाकडून काही दिवसांपूर्वी अचानक श्रीरामकुंडावर हिंदी, मराठी, इंग्रजी भाषेबरोबरच पहिल्यांदाच गुजराती भाषेतील ठळक असे सूचना फलक दर्शनी भागावर लावण्यात आले आहेत.

दर बारा वर्षांनी येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यातही गुजराती भाषेतील फलक कधी झळकले नव्हते. महापालिका निवडणूक संपल्यानंतर व भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरच प्रशासनाला गुजरातीचा पुळका का सुटला, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. रामकुंडावर येणारे भाविक हे सर्वभाषिक असले तरी त्यातील सर्वाधिक संख्या ही मराठी भाषिकांची व मराठी माणसांची असते. नाशिककरांसह सर्वच भाविकांनी गोदावरीचे पावित्र्य आणि महत्व जपण्याचे काम केले आहे. येणाऱ्या भाविकांना हिंदीतील सूचना फलक समजू शकतात, असे असतानाही गुजरातीचा अट्टहास आत्ताच का, असा प्रश्न उपस्थित होतो. राज्याबरोबरच केंद्र शासनही प्रशासनावर खूष राहावे, यासाठी हा खटाटोप केला असावा, अशी चर्चा सुरू आहे.

प्रशासनाकडून सारवासारव

गुजराती भाषेतील या सूचना फलकाबाबत आयुक्तपदाचा तात्पुरता कार्यभार असलेले उपायुक्त किशोर बोर्डे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘सूचनाफलक पूर्वीही होते, पावसाळ्यात ते वाहून गेले, त्यामुळे नवीन लावण्यात आले. दक्षिणेतून व विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी इंग्रजी भाषा, उत्तर हिंदुस्थानातील भाविकांसाठी हिंदी, गुजरातमधून येणाऱ्यांसाठी गुजराती, तर महाराष्ट्रातील भाविकांसाठी मराठी भाषेतील हे सूचना फलक आहेत. शेवटी भाविक हे सर्वभाषिक असतात, म्हणून महापालिकेने असे फलक लावले आहे’ अशी सारवासारव त्यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या