गुजरातच्या व्यापा-यांनी पापलेटचे भाव २०० रुपयांनी पाडले

37

सामना ऑनलाईन। भाईंदर

ज्या दिवशी जाळ्यात पापलेट गावते तो दिवस मच्छीमारांसाठी सगळ्यात आनंदाचा.. पण गुजरातच्या बडय़ा व्यापाऱयांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी पापलेटचे भाव किलोमागे दोनशे रुपयांनी पाडल्यामुळे भाईंदर ते डहाणू पट्टय़ातील मच्छीमार हवालदिल झाले आहेत. गुजरातच्या व्यापाऱयांनी जाणूनबुजून केलेल्या या कावेबाजपणामुळे महाराष्ट्राच्या पश्चिम पट्टय़ातील मच्छीमार कर्जाच्या बोजाखाली पुरते दबून जाणार आहेत.

राज्यात १ ऑगस्टपासून मासेमारीचा हंगाम सुरू झाला आहे. पश्चिम किनारपट्टीवरील किमान १७०० बोटी मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रात जातात. येथील स्थानिक मच्छीमार दरवर्षी गुजरातच्या व्यापारांबरोबर चर्चा करून पापलेटचा दर ठरवतात. डॉलरचा दर गेल्या वर्षी ६७ रुपये होता, यंदा तो ६४ रुपये इतका घसरल्यामुळे पापलेटच्या दरात किमान ५० ते ६० रुपयांची घसरण होईल, असा अंदाज येथील मच्छीमारांना होता. मात्र नेहमी मासळी खरेदी करणाऱया गुजरातच्या बडय़ा निर्यातदार व्यापारांनी यावेळी संगनमत करून पापलेटचे दर थेट २०० रुपयांनी पाडले. त्यामुळे प्रत्येक मच्छीमाराला किमान लाख ते दोन लाख रुपयांचा फटका बसणार आहे.

मच्छीमारांनी पापलेटचे भाव तब्बल किलोमागे दोनशे रुपयांनी पाडल्याने मच्छीमारांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.  दुबई आणि पाकिस्तान येथून मुबलक पापलेट येत असून ती स्वस्त मिळत आहेत. म्हणूनच आम्ही कमी दरात खरेदी करतो आहोत असे या व्यापारांचे म्हणणे आहे तर दुसरीकडे पापलेट साठविण्यासाठी कोणतीही सोय नसल्यामुळे आणि मिळालेला म्हावरा विकला गेला तर कर्जाची परतफेड करता येईल, मुलाबाळांना गोडधोड खाऊ घालता येईल, दोन कपडे घेता येतील, यासाठी स्थानिक मच्छीमार आपला माल या गुजराती व्यापारांना मिळेल त्या भावात विकत आहेत.

गुजराती व्यापाऱयांच्या या दंडेलीविरोधात स्थानिक मच्छीमार आणि संघटनांची उत्तन येथे तातडीची बैठक झाली. डोक्यावरचे कर्ज दूर होणे सोडाच पण बोजा आणखी वाढून शेतकऱयांप्रमाणेच आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल, अशी व्यथा मच्छीमारांनी व्यक्त केली आहे. याबाबत सरकारकडे दाद मागण्यात येईल अशी माहिती अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे कार्याध्यक्ष बर्नाड डिमेलो यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या