सगळ्यांच्या आवडत्या ‘गुलाबजाम’ला हे नाव का मिळालं? वाचा हा चविष्ट इतिहास…

तुमचा आवडता गोड पदार्थ कोणता? हे विचारलं तर बहुतेकांचं उत्तर असेल गुलाबजाम. वाढदिवस, समारंभ, बारसे, लग्न ते सणवार.. सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ आहे. अगदी गोड न खाणारे अनेक जण एखादा गुलाबजाम तरी चाखून बघतातच. पण, या पदार्थाला हे नाव कसं मिळालं? हिंदुस्थानातल्या पंगतीची शोभा वाढवणारा हा गुलाबजाम नेमका जन्माला तरी कसा आला? या मागे एक रंजक इतिहास आहे.

हिंदुस्थानी पंगतीत आज गुलाबजामने स्वतःचं असं स्थान मिळवलं आहे. पण, हा गुलाबजाम मूळचा हिंदुस्थानी पदार्थ नाहीच मुळी.. तो आला पर्शियातून. जिलेबी, समोसा असे अनेक पदार्थ पर्शियन लोकांनी हिंदुस्थानात आणले. त्यासोबत हा पाकाने टम्म फुगलेला गुलाबजामही हिंदुस्थानात दाखल झाला आणि हाहा म्हणता लोकांच्या जिभेवर रुळला.

गुलाबजाम या शब्दाचं हिंदी रूप आहे गुलाब जामून. आता तुम्ही म्हणाल की, गुलाब आणि जामून हे दोन्ही जिन्नस गुलाबजाममध्ये नसतात. पण, मग हेच नाव त्याला का मिळालं? याचं उत्तर मध्ययुगीन पर्शियन खाद्यइतिहासात सापडतं.

पर्शियन खाद्यसंस्कृतीत हा पदार्थ गोड म्हणून खाल्ला जात होता. मैद्याच्या पिठाचा तुपात तळलेला गोल गरगरीत गोळा हे गुलाबजामचं आधुनिक रूप आहे. पर्शियात तो लांबट गोल आकाराचा बनत असे. हा लांबट गोल आकार म्हणजे जामून किंवा जांभळासारखा दिसायचा. म्हणून गुलाबजामूनमध्ये जामून हा शब्द समाविष्ट झाला.

गुलाबजामला गोडपणा त्यातल्या पाकामुळे येतो. त्यामुळे हा पाक बरोबर बेताचा तयार करणं, ही एक कलाच आहे. पण, पर्शियन लोक खाण्याच्या बाबतीत आणखी रसिक होते. त्यांनी या पाकाला सुगंध येण्यासाठी त्यात गुलाबाचा अर्क टाकायला सुरुवात केली. त्यामुळे पाक सुगंधी तर होत असेच पण पर्शियाच्या वातावरणात तो टिकूनही राहत असे. गुलाबाचा अर्क टाकलेल्या पाकातला जामून किंवा जांभळाच्या आकाराचा गोळा म्हणून या गोड पदार्थाला गुलाबजामून असं म्हटलं जाऊ लागलं.

गंमत म्हणजे काही पर्शियन लोक त्यात गुलाबाऐवजी केवड्याचा अर्कही टाकत असत. पण, त्याचं नाव गुलाबाशी जोडलं गेलं ते कायमचं. असा हा गुलाबजाम पर्शियन लोक हिंदुस्थानात घेऊन आले. हिंदुस्थानात तो कालांतराने सर्वदूर पसरला आणि लोकांचा लाडका झाला.

आता त्याचा मूळ जांभळाचा आकार जाऊन तिथे गोल गरगरीतपणा आला तरी त्याचं नाव जामूनशी जोडलं गेलं तेही कायमचं. मराठीत जामून या शब्दाचा अपभ्रंश झाला आणि त्या जागी जाम असा शब्द रुढ झाला.

आपली प्रतिक्रिया द्या