Video – गुलाबजाम पाव ते कुरकुरे मिल्कशेक, खवय्यांनी चाखली अनोख्या पदार्थांची चव

खादाडगिरी करणाऱ्यांनी 2019 या वर्षात अनेक अनोख्या पदार्थांची चव चाखली. गेल्यावर्षी गुलाबजाम पावपासून ते कुरकुरे मिल्कशेक, गोड मॅगी, चोको चेरी डोसा आणि गुलाबजामची भाजीपर्यंतच्या अनोख्या पदार्थांची चव खवय्यांनी चाखली. या वेगळ्याच कॉम्बिनेशचे पदार्थ सोशल मीडियावरही चर्चेत राहिले. घेऊया याचा थोडक्यात आढावा…

गोड मॅगी –
चवीपुरते मीठ, तिखट, आवश्यक असल्यास कांदा किंवा कांद्याची पात टाकून दोन मीनिटात तयार होणारी तिखीट मॅगी आपण खाल्ली असेल. मात्र 2019 मध्ये स्वीट अर्थात गोड मॅगीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. पाणी, दूध, गुलाबाच्या पाकळ्या, कंडेन्स मिल्क आणि केवडा यांचे वेगळे कॉम्बिनेशन बनवून ही स्वीट मॅगी तयार करण्यात आली. याचा व्हिडीओ ट्वीटरवर अडीच लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला.

कुरकुरे मिल्कशेक –
कुरकुरे तुम्ही-आम्ही खाल्ले आहेतच. वेगवेगळ्या प्लेव्हरमध्ये मिळणारे कुरकुरे खायला सर्वांनाच आवडते. तसेच मिल्कशेकही आरोग्यासाठी लाभदायक असते. मात्र या दोन पदार्थांचे कॉम्बिनेशन करून एखादा पदार्थ तुम्हाला चाखायला दिला तर…? तोंडाला पाणी सुटले ना. तर 2019 मध्ये अशाच कॉम्बिनेशनच्या मिल्कशेकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. नोव्हेंबरमध्ये याचा फोटो व्हायरल झाला.

गुलाबजाब पाव –
साधारणत: वडापाव किंवा समोसापाव किंवा भजीपाव हे कॉम्बिनेशन आपल्याला माहिती आहे. मात्र गेल्या वर्षी अखेरच्या महिन्यामध्ये गुलाबजाम आणि पाव असे विचित्र कॉम्बिनेशनचा पदार्थ व्हायरल झाला. अनेकांनी हे असे कसे होऊ शकते म्हणून यावर टीकाही केली, तर काहींनी याची प्रशंसा करत हे नवीन कॉम्बिनेशन नक्कीच ट्राय करायला हवी अशी प्रतिक्रिया दिली.

चोको चेरी डोसा –
डोसा म्हटले की आपल्या डोळ्यासमोर साधा डोला, मसाला डोसा, चिज मसाला डोसासह विविध प्रकारचे डोसे येतात. मात्र चॉकलेट, ड्रायफ्रूट आणि चेरीचा वापर करून तयार केलेला डोसा कधी तुम्ही खाल्ला आहे का..? नाही ना. पण गेल्यावर्षी या चोको चेरी डोसाची चांगलीच चर्चा खवय्यांच्या तोंडी होती. सप्टेंबरच्या महिन्यात हा डोसा बनवण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

गुलबाजामची भाजी –
गोड, रसरसीत गुलाबजाम कोणाला आवडत नाही. मात्र याची भाजी करून तुम्हाला खाऊ घातली तर..? आहे की नाही भन्नाट आयडिया. तर गेल्यावर्षी राजस्थानमध्ये गुलाबजामची भाजी खवय्यांच्या ताटामध्ये दिसून आली आणि याची सोशल मीडियावर चर्चा रंगली. ऑगस्टमध्ये याचा एक फोटोही शेअऱ करण्यात होता.

हे सर्व पदार्थ सोशल मीडियावर चर्चेचा विषय राहिले होते. याची चव कशी आहे आणि याचा शरिरावर चांगला किंवा वाईट काय परिणाम होतो याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे अशा अनोख्या कॉम्बिनेशची चव चाखण्यापूर्वी एखाद्या एक्सपर्टचा नक्की सल्ला घ्या.

आपली प्रतिक्रिया द्या