बंदुका, बॉम्ब आणि ईव्हीएम

492

<< रोखठोक >>   संजय राऊत 

sanjay-raut

बंदुका, बॉम्ब आणि पैसे हातात असलेल्यांना पूर्वी निवडणुका जिंकणे शक्य झाले. बिहार-उत्तर प्रदेश, कश्मीर खोऱ्यात हे घडले. आता बंदुका, बॉम्बची जागा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राने म्हणजे EVMने घेतली काय? मुंबईसह १० महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांतील निकालानंतर जागोजागी ईव्हीएमच्या अंत्ययात्रा काढण्यात आल्या. हे कसलं लक्षण समजायचे?

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा डंका आपण वाजवतो. मतदान ही त्या लोकशाहीची तटबंदी. पण आपणच केलेल्या मतदानावर लोकांचा विश्वास उरलेला नाही. मतदान यंत्रणेत घोटाळा झाला आहे, असे सांगणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात वाढली आहे. पूर्वी महाराष्ट्रात काही वाईट घडले की, त्या वाईट घटनेची तुलना बिहारशी करण्याची परंपरा होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच परंपरेस जागत शिवसेनेच्या राजवटीत मुंबईचा पाटणा झाल्याची बोंब ठोकली. ते सर्वस्वी चूक आहे. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहारने प्रगतीत चांगली झेप घेतली आहे. पाटण्याची कायदा सुव्यवस्था उत्तम आहे. बिहारात पूर्वी निवडणुका हा फार्स होता. ज्यांच्या हातात बंदुका आणि बॉम्ब तो निवडणूक प्रक्रियेचा मालक हे चित्र मी स्वतः पाहिले आहे, पण याबाबतीतही बिहारने उत्तम कामगिरी करून दाखविली. पैसा आणि दिल्लीच्या आमिषांना बळी न पडता बिहारच्या जनतेने भारतीय जनता पक्षाचा पराभव केला व नितीशकुमारांची राजवट पुन्हा आणली. लालू यादवांचा पक्ष सत्तेत सहभागी असतानाही बिहारातील राजकीय, सामाजिक आणि कायद्याची घडी ठीकठाक आहे, पण बिहारच्या निवडणुकांत कालपर्यंत जे घडत होते ते मुंबई-महाराष्ट्रातील निवडणुकांत घडले आहे काय? बॉम्ब आणि बंदुका नाहीत, पण ज्यांच्या हाती पैसा व इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन आहेत त्यांनी निवडणुका जिंकल्या आहेत काय ही शंका आहे व महाराष्ट्रात त्यावरून मोठे वादळ निर्माण झाले आहे.

इतके मतदान?

नागपूर-अकोल्याचे ठीक आहे, चंद्रपूर-पुण्याचेही मान्य करू, पण मुंबई व इतरत्र भारतीय जनता पक्षाला इतके मतदान कसे झाले? या प्रश्नावर भाजपविरोधात लोकमत बिथरले व राजकीय पक्ष एकवटले. ईव्हीएमविरोधात अकोला-अमरावतीसारख्या जिल्ह्यांत कडकडीत बंद पाळला गेला. पुण्यात ‘ईव्हीएम’ची प्रचंड अंत्ययात्रा काढून अंत्यसंस्कार केले व या आंदोलनात हजारो लोक जमा झाले. नागपुरातही मोर्चे निघत आहेत. हे चित्र पाहिले तर लोकांच्या मनात त्यांनीच केलेल्या मतदानाविषयी शंका निर्माण झाली. हे पारदर्शक लोकशाहीचे लक्षण नाही. मुख्यमंत्री फडणवीस हे सध्या सगळ्यात आनंदी आहेत. भारतीय जनता पक्षाला विजयी केल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत, पण जे लोक ‘मतदान’ घोटाळ्यांबाबत रस्त्यांवर उतरले आहेत त्यांची समजूत ते कशी घालणार?

राणे योग्यच बोलले

महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुकीत ‘ईव्हीएम’ मशीनमध्ये गडबड असल्याचं वाटत नाही. पराभव हा पराभव असतो, तो स्वीकारला पाहिजे, असे मत काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी व्यक्त केले. मी स्वतः याच मताचा आहे. इथे दोन गोष्टी मी लक्षात आणून देतो. राणे हे अनुभवी आहेत. अनेक विजयांबरोबर त्यांनी मालवण व वांद्रे पूर्व येथील निवडणुकांतील पराभव पचवले आहेत व पराभवानंतरही त्यांनी ‘ईव्हीएम’ मशीनला दोष दिला नाही हे महत्त्वाचे. हे खिलाडूपणाचे लक्षण आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणूक त्यांनी जिंकली. ही निवडणूक ते हरले असते तर ‘ईव्हीएम’ मशीनसंदर्भात त्यांचे हे मत कायम राहिले असते काय? दुसरे महत्त्वाचे असे की, ‘ईव्हीएम’ मशीनच्या विरोधात सुरू असलेल्या गोंधळावर भारतीय जनता पक्षाने कोणतेही भाष्य व्यक्त केले नाही, भारतीय जनता पक्षाचे खासदार किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत अनेक घोटाळ्यांवर आवाज उठविला, पण ‘ईव्हीएम’ मशीन फ्रॉड व भ्रष्ट आहेत आणि मशीन मॅनेज करून निवडणुका जिंकल्या जाऊ शकतात हा आरोप पुराव्यासह करणाऱ्यांत १० वर्षांपूर्वी किरीट सोमय्या आघाडीवर होते. केंद्रात व महाराष्ट्रात काँग्रेसचे राज्य पुन्हा आल्यावर ‘हा ईव्हीएम मशीनचा घोटाळा आहे, काँग्रेस जिंकू शकत नाही,’ असे सांगणारे सोमय्या हैदराबादमधील चार ‘आयटी’ अभियंत्यांसह शिवसेना भवनात आले. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘ईव्हीएम’ मशीन घोटाळ्याचे प्रात्यक्षिक दाखवले. कमळ आणि धनुष्यबाणाचे बटन दाबल्यावर ही मते हाताचा पंजा किंवा घड्याळाकडे कशी वळतात याचे ते जोरदार प्रात्यक्षिक होते व असे घोटाळे करूनच काँग्रेस-राष्ट्रवादी देशात-महाराष्ट्रात जिंकल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यासंदर्भात ते कोर्टातही गेले. सत्यवादी सोमय्यांनी भाजप विजयाचा जल्लोष केला, पण विजयात ‘ईव्हीएम’ मशीनचा घोटाळा आहे असे लोकांना वाटते त्यांचे आता कोणी ऐकायचे?

मुंबईतील एक निवृत्त पोलीस अधिकारी संजीव कोकीळ यांनी एक ‘पत्र’ सोशल मीडियावर प्रसारित केले. ते फक्त वाचकांच्या माहितीसाठी जसेच्या तसे देत आहे. कोणत्याही विशेष टिपणीशिवाय..

‘‘सन 2010 मध्ये मी जेव्हा माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाणे, क्रॉफर्ड मार्केट, मुंबई येथे कर्तव्यास होतो तेव्हा फोर्टमधील कलेक्टर ऑफिसमधून EVM voting machine गहाळ झाल्याची तक्रार दिली गेली. त्या तपासात एसीपी विलास मराठे यांनी खूप छान मार्गदर्शन केलं होतं.. तपासाचे धागेदोरे त्यावेळी आंध्रचा एक अतिशय हुशार IT इंजिनीअर, त्याचं नाव हरी असं होतं… त्याच्यापर्यंत पोहोचले होते. आम्ही त्याला अटक केली होती….. ते प्रकरण खूप गाजलं होतं….. अटकेत असताना हरीनं सांगितलं की, या EVM मशीन्स तकलादू असून सहजपणे, पाहिजे तसा बदल केला जाऊ शकतो. IT तज्ञांना ते अवघड नाही! त्यावेळी या हरीला अटक केल्यानंतर मा. किरीट सोमैया, मा. राज पुरोहित हे हरीच्या समर्थनात पोलीस ठाण्यात आले होते… चौकशीकामी!

नंतरच्या काळात एसीपी विलास मराठेंची बदली झाली. त्या ठिकाणी कमिशनर संजीव दयाळ यांनी महान एसीपी अनिल महाबोले यांची नेमणूक केली. काम एकच दिलं, कोकीळला सळो की पळो करा. त्यांनी त्याप्रमाणे खोटी कागदपत्रे तयार केली. दुसऱया प्रकरणात कट मस्त शिजला…. शिजवला. मला जानेवारी २०११ नंतर जो काय त्रास दिलाय की, नंतर मला नोकरीतून काढण्यात आलं.

आज फेसबुकवर EVM मशीन्सच्या कार्यक्षमतेबाबत बातमी वाचली. माझी स्मृती चाळवली अन् आरोपी हरीसाठी मा. किरीट सोमैयाजी अन् मा. राज पुरोहितजी यांनी पोलीस ठाण्यात पायधूळ झाडल्याचे आठवले. त्यानिमित्ताने का होईना, त्यांचे दर्शन घडले इतकेच.’’

– संजीव कोकीळ, निवृत्त पोलीस अधिकारी

घोटाळ्यांची परंपरा

‘ईव्हीएम’ मशीनची मतदान प्रक्रिया घोटाळ्याची आहे व अजिबात पारदर्शक नाही यावर रान उठविणारे भारतीय जनता पक्षाचेच ‘चाणक्य’ होते. भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारे डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी ‘ईव्हीएम’ मशीन घोटाळ्याची लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेली. श्री. स्वामी आज भाजपात आहेत. डॉ. स्वामींच्या प्रत्येक लढाईवर लोकांनी डोळे मिटून विश्वास ठेवला आहे. हे सर्व पाहिले तर महाराष्ट्रात मतदान घोटाळा झाला असेल तर त्यास भारतीय जनता पक्षाने सामोरे झाले पाहिजे. मुंबईच्या मतदार याद्यांतून अचानक १२ लाख मते गायब व्हावीत व त्यातील बहुसंख्य नावे मराठी असावीत हा योगायोग नक्कीच नाही. बहुमतवाल्यांचे राज्य येते असे म्हणायचे व त्यात १२ लाख मतदारांचा हक्क डावलायचा हासुद्धा लोकशाहीतील घोटाळा आहे.

हे जरा पहाच

नाशिकमध्ये एका प्रभागात २३ हजार इतके मतदान झाले, पण इलेक्ट्रॉनिक मशीनने मोजली २७ हजार मते. मग ही चार हजार जादा मते आली कुठून? पुण्याचा हत्ती गणपती हा मानाचा गणपती आहे. या मंडळाचा अध्यक्ष हा ताकदीचा व जनसंपर्क असलेला कार्यकर्ता असतो. श्याम मानकर हे या गणपती मंडळाचे अध्यक्ष प्रख्यात ‘दुर्वांकुर’ डायनिंगचे मालक. त्यांना फक्त सात मते पडावीत याचे आश्चर्य वाटते. अनेक विद्यमान नगरसेवकांना शून्य मते पडली. निदान स्वतःचे मत तरी त्यांना पडायलाच हवे. तसे झाले नाही.

नाशिकच्या अनेक प्रभागांत असे घोटाळे उघड झाले. पुण्यातील ज्या प्रभागात मुख्यमंत्र्यांच्या सभेला १५ माणसेही जमली नाहीत, तेथील भाजपच्या उमेदवार मुक्ता टिळक २३ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाल्या. मुख्यमंत्र्यांच्या फसलेल्या सभेचे उट्टे ‘ईव्हीएम’ मशीनने काढले काय? असा प्रश्न आता लोक विचारतात.

जगात काय झाले?

अमेरिकेत इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धती नाही हे लक्षात घेतले पाहिजे.

२००६ मध्ये नेदरलॅण्डमध्ये “We Do not trust electronic voting machines” नावाच्या एका संघटनेने electronic voting machines (EVM) या ५ मिनिटांत हॅक करता येतात, हे सप्रमाण सरकारला सिद्ध करून दाखवले. परिणामी तिथल्या सरकारने जनभावनेची कदर करून EVM वर बंदी घातली.

२००९ मध्ये जर्मनीच्या सर्वोच्च न्यायालयाने EVM या ‘‘असंविधानिक’’ आहेत, असा निकाल दिला. परिणामी जर्मनीने पण EVM System बॅन करून पारंपरिक बॅलट पद्धती अवलंबली.

आयर्लंड या देशानेही २००६ साली इलेक्ट्रॉनिक व्होटिंग पद्धती रद्दबातल ठरवली. या सिस्टममध्ये पारदर्शकता नसल्याचं तिथल्या कोर्टाचं म्हणणं होतं.

२००९ साली झालेल्या निवडणुका “Invalid” असल्याचा धक्कादायक निकाल तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. तर ही काही उदाहरणं आहेत. जगभरात या electronic voting machine बद्दल विरोधाचे आवाज उठताहेत. अनेक देशांतील लोक या इलेक्ट्रॉनिक पद्धतीविरोधात उभे ठाकले आहेत, पण त्यांच्यात एक सुसूत्रता आहे. त्यांनी संघटितपणे या चुकीच्या पद्धतीबद्दल आवाज उठवला होता. वापरण्यात येणाऱया मशीन्सचा पूर्ण अभ्यास करून त्या कशा हॅक करता येऊ शकतात याचा शोध घेऊन त्यांनी संबंधित न्यायव्यवस्थेसमोर ते उघड केलं होतं.

खुद्द आमच्या दिल्लीच्या हायकोर्टाने २०१२ साली सांगितले आहे. ‘‘इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राविषयी शंका घेण्यास जागा आहे. या मतदान यंत्रामध्ये फेरफार करणे शक्यच नाही असे म्हणता येणार नाही!’’

महाराष्ट्रातील मतदारांचा उद्रेक का झालाय? ते आता समजून घेतले पाहिजे.

बॉम्ब, बंदुका आणि ‘ईव्हीएम’ हीच निवडणुका जिंकण्याची हत्यारे बनली असतील तर लोकशाहीचा खून झालाय व खुनी मोकाट फिरत आहेत, हे कायद्यानेच जाहीर करावे लागेल.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या