कारगील युद्धावरचा ‘हा’ चित्रपट झळकणार नेटफ्लिक्सवर, निर्मात्याची घोषणा

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनचा परिणाम चित्रपट व्यवसायावरही झाला आहे. त्यामुळे अनेक निर्मात्यांनी आपले चित्रपट ओटीटी माध्यमातून प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्या बालनचा शकुंतला, आयुष्मान-अमिताभ यांचा गुलाबो सिताबो हे काही चित्रपट ऑनलाईन झळकणार आहेत. त्यात अजून एका हिंदी चित्रपटाची भर पडणार असून हा कारगिल युद्धावरचा चित्रपट असणार आहे.

हा चित्रपट म्हणजे करण जोहर याच्या धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेला गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल आहे. शरण शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट 13 मार्च 2020 रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, काही कारणाने तो पुढे ढकलला गेला आणि लॉकडाऊनमुळे आता तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकणार आहे. नेटफ्लिक्स या अॅप्लिकेशनवर हा चित्रपट लवकरच झळकेल, अशी घोषणा चित्रपटाचा निर्माता करण जोहर याने केली आहे. एका व्हिडीओच्या माध्यमातून करणने ही घोषणा केली आहे. मात्र, हा चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होईल, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

जान्हवी कपूर या चित्रपटात गुंजन सक्सेना यांच्या भूमिकेत असून हा तिचा दुसरा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात गुंजन यांच्या वडिलांच्या भूमिकेत अभिनेता पंकज त्रिपाठी झळकणार आहे. या खेरीज अंगद बेदी, विनित कुमार आणि मानव वीज यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. काही काळापूर्वी त्याचं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं होतं.

कोण आहेत गुंजन सक्सेना?
गुंजन सक्सेना या हिंदुस्थानच्या वायुदलात फ्लाईट लेफ्टनंट पदावर कार्यरत होत्या. कारगिल गर्ल अशी ओळख असणाऱ्या गुंजन 1996च्या कारगिल युद्धादरम्यान चीता हेलिकॉप्टरच्या साहाय्याने युद्धातील जखमी जवानांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं कार्य करत होत्या. पाकिस्तानी सैन्याकडून डागलेल्या मिसाईलच्या कचाट्यात त्यांचं हेलिकॉप्टरही सापडलं. पण त्या थोडक्यात बचावल्या. या हल्ल्यानेही न डगमगता त्यांनी आपलं काम सुरूच ठेवलं. त्यांच्या या अतुलनीय साहसासाठी त्यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या