संपत्ती जप्त होताच पन्नूचा तीळपापड, हिंदुस्थानला धमकी दिली

Sikhs for Justice (SFJ) chief Gurpatwant Singh Pannun

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूची पंजाब आणि चंदिगड येथील मालमत्ता राष्ट्रीय तपास एजन्सी (एनआयए) ने जप्त केली. अमृतसरमधील गाव खानकोटमधील पन्नूची 46 कॅनॉलची मालमत्ता जप्त केली. हिंदुस्थानच्या या कारवाईने पन्नूचा तीळपापड झाला आहे. त्याने पुन्हा हिंदुस्थानला धमकी द्यायला सुरुवात केली आहे.

अमृतसरमधील खान कोट हे पन्नूचे मूळ गाव आहे. हे अॅग्रीकल्चर लॅण्ड आहे. तर चंदिगडच्या सेक्टर-15 सीमधील पन्नूचे घरही ‘एनआयए’ने जप्त केले आहे. ही सर्व मालमत्ता आता सरकारची झाली आहे. पन्नू शीख फॉर जस्टिस (एसएफजे) या संघटनेचा म्होरक्या आहे. कॅनडा आणि अन्य देशातून हिंदुस्थानविरोधात तो कारवाया करीत आहे. नुकत्याच हिंदुस्थान-कॅनडा वादात त्याने कॅनडात राहणाऱया हिंदूंना धमकी दिली होती.

आता संपत्ती जप्त झाल्याने पन्नूला मिरच्या झोंबल्या आहेत. आपल्याविरुद्ध कारवाई केल्याने आपण गप्प बसणार नाही, अशी धमकी त्याने हिंदुस्थानला दिली आहे. यापूर्वीही त्याने कॅनडात राहणाऱ्या हिंदुस्थानी नागरिकांना धमकावलं होतं. आता संपत्ती जप्त झाल्यानंतरही त्याने धमक्या दिल्या आहेत. हिंदुस्थानविरुद्धच्या संघर्षात एखाद्या व्यक्तिची संपत्ती हा मुद्दा नाही. आम्ही खलिस्तान बनवणारच, अशी धमकी त्याने दिली आहे. 2020मध्ये हिंदुस्थान सरकारने पन्नूला दहशतवादी घोषित केलं होतं. पन्नू हा हरदीप सिंह निज्जर याच्यासह काम करत होता.