माऊलींची गुरुभक्ती

>> प्रा. मनीषा रावराणे

ज्ञानेश्वरी लिहिण्यामागे प्रेरणा गुरू श्रीनिवृत्तीनाथांची! त्यामुळे व ज्ञानोबांच्या पराकोटीच्या गुरुभक्तीमुळे यात ठायी ठायी गुरुभक्तीच्या ओव्या दिसतात. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ज्ञानदेवांच्या गुरुभक्तीची शब्दसुमनं वेचूया.

ज्ञानेश्वरी हे एक अद्भुत लेणं आहे. या लेण्यातील एकेक शिल्प म्हणजे एकेक अध्याय होय. अतिशय उत्तुंग, कलात्मक, कोरीव असं हे शिल्प आहे. हे पाहताना मन आनंदित होतं. ‘पाहताना’ असं जाणीवपूर्वक म्हटलं आहे, कारण ज्ञानदेव आपल्यापुढे चित्रपटाप्रमाणे वर्णन उभं करतात. ते मनाला समृद्धही करतं आणि समाधानही देतं.

ज्ञानेश्वरी लिहिण्यामागे प्रेरणा गुरू श्रीनिवृत्तीनाथांची! त्यामुळे व ज्ञानोबांच्या पराकोटीच्या गुरुभक्तीमुळे यात ठायी ठायी गुरुभक्तीच्या ओव्या दिसतात. या संपूर्ण रत्नाकरांमधून अशी रत्नं काढणं म्हणजे अवघडच काम. तरी यातील काही ओव्या वानगीदाखल पाहू. तेराव्या अध्यायातील अशा काही हृद्य ओव्या पाहूया.

तियेकडोनि येतसे वारा । देखोनि धांवे सामोरा ।
आड पडे म्हणे घरा । बीजें कीजो ? ओ. क्र. 375

त्या (गुरूच्या) दिशेकडून येणाऱ्या वाऱ्यासही सामोरा जाऊन त्यास जो साष्टांग नमस्कार घालतो आणि माझ्या घरी वस्तीला यावे अशी प्रार्थना करतो. यात गुरूकडून येणारा वारा म्हणजे गुरुकृपेचा, ज्ञानाचा वारा अशी सूचकता मनाला भिडते.
तर पुढे एका ओवीत ज्ञानोबा म्हणतात, खऱ्या प्रीतीने वेडावून जाऊन गुरू ज्या दिशेस राहतात, त्या दिशेशीच बोलणे ज्याला आवडते व जो गुरूंच्या घरी आपला जीव वतनदार करून ठेवतो.

साचा प्रेमाचिया भुली। तया दिशेसीचि आवडे बोली।
जीवु थानपती करूनि घाली। गुरुगृहीं जो।। ओ. क्र. 376

गुरू राहतात ती दिशा म्हणजे गुरूंनी दाखवलेला मार्ग होय, तोच त्याला आवडतो. गुरू, त्यांची शिकवण अशा शिष्याच्या मनात सतत असते हे सांगण्यासाठी ‘जीवु थानपती करूनि घाली’ अशी सुंदर कल्पना व शब्दकळा माऊली योजतात.
गुरूवर असलेलं प्रेम किती? तर आकाशाएवढं अफाट! असं सांगणारी ही ओवी!

तैसा गुरुकुळाचेनि नांवें। महासुखें अति थोरावे।
जे कोडेंही पोटाळावे। आकाश कां ।। ओ. क्र. 382

गुरूच्या कुळाचे नाव ऐकताच तो महासुखाने अतिशय थोरावतो. इतका की कौतुकाने आकाशच वेंगेत धरीत आहे की काय! गुरूच्या कुळाचे केवळ नावसुद्धा ऐकून महासुख होणं आणि त्यामुळे कौतुकाने आकाशच कवेत घेणं यातील अनंतता आपल्याला भावते.

यानंतरच्या एका ओवीत गुरुभक्ताचे वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात, मी गुरूंच्या पादुका होईन, त्या पादुका मीच गुरूंच्या पायी लेववीन आणि छत्रही मीच होऊन ते मीच गुरूंवर धरेन.

पाउवा मी होईन । तियां मीचि लेववीन ।
छत्र मी आणि करीन । वारीपण।। ओ. क्र. 416

गुरुभक्तीची परिसीमा दाखवणारी अशीच अजून ओवी! त्यात म्हटलं आहे- ‘गुरूंची झारी हातात घेणारा शागीर्द मी होईन व गुरूंना चूळ भरण्यास पाणीही मीच देईन व चूळ भरण्याचे निर्मळ तस्तही मीच होईन.’

मीचि होईन सगळा । करूं सुईन गुरूळा ।
सांडिती, तो नेपाळा । पडिधा मीचि।। ओ. क्र. 418

ज्ञानदेवांचा हा गुरुभक्तीचा हा झरा आपल्यामध्येही पाझरत, खळाळत राहो, ही प्रार्थना!