गुरूपुष्यामृत… जगणे शुभ करा !

413

वंदना चौबळ

गुरूपुष्यामृत… शुभमुहूर्त… या शुभमुहूर्तावर थोडं समाजासाठी… थोडं स्वत:साठी जगून पाहूया.

कोणतंही चांगलं कार्य सुरू करायचं तर गुरुपुष्यामृत हा मुहूर्त मानला जातो. नव्या घरात प्रवेश करायचा किंवा सोने व चांदी खरेदी करायची असली तरीही हाच मुहूर्त धरतात. मालमत्ता आणि इतर मोठ्या गुंतवणुकीला प्रारंभ करतानाही गुरुपुष्यामृताचा मुहूर्त धरला जातो. म्हणूनच शुभ कार्य आणि गुरुपुष्यामृत यांचा खूप जवळचा संबंध… या योगाला एवढे महत्त्व असताना हाच मुहूर्त साधून एखादे समाजोपयोगी काम सुरू करायला काय हरकत आहे?

दुसऱ्याला देणं ही गोष्ट आज पाहायलाच मिळत नाही. गुरुपुष्यामृताचा मुहूर्त साधून दुसऱ्यासाठी काहीतरी करता येऊ शकेल. स्वतःसाठी खूप जगलो आता काही काळ दुसऱ्यांसाठी जगूया… असं म्हणता येईल. अमरावतीच्या एका वेल्डिंगचं काम करणाऱ्या माणसाने स्वतःकडे फारशी सुबत्ता नसतानाही गरीबांसाठी अन्नछत्र सुरू केलं. विठ्ठल सोनसळकर असं नाव असलेल्या या माणसाने तब्बल २५ वर्षांपूर्वी सुरू केलेलं हे व्रत आजतागायत सुरू आहे. हातगाडीवर गॅस वेल्डिंगचं काम करणाऱ्या माणसाची संपत्ती ती काय असणारे? पण त्यातूनही त्याने मनाचा मोठेपणा दाखवला आहे.  असं काहीतरी करता येईल. त्याची सुरुवात गुरुपुष्यामृताच्या निमित्ताने करायची.

दुसऱयासाठी कशाला, स्वतःसाठीही थोडं वेगळं काहीतरी करायचं तरीही गुरुपुष्यामृताचा मुहूर्त साधता येईल. आतापर्यंत जगलो नाही अशी जीवनशैली जगून पाहायला काय हरकत आहे? त्यासाठीही हा मुहूर्त साधा ना… निवृत्तीनंतर आयुष्यात करायच्या राहून गेलेल्या गोष्टी करायचा मुहूर्त म्हणून तरी गुरुपुष्यामृताकडे पाहाता येईल. आतापर्यंत नोकरीच्या गडबडीत समाजासाठी काहीच करता आलं नाही ही खंत मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालेल्या अविनाश कुलकर्णी यांना होती. पण निवृत्तीनंतर त्यांनी अनेक अशिक्षितांना शिक्षण देण्याचा वसाच घेतला.

l गुरुपुष्यामृत योगाचा मुहूर्त साधून धार्मिक पुस्तके वाचायला सुरुवात करा. आपण वाचलेल्या गोष्टी आयुष्यात प्रत्यक्ष कशा वापरता येतील ते पाहायचे.

l दिवसातून किमान १५ मिनिटे मनन करायचं. त्याची सुरुवात गुरुपुष्यामृताच्या निमित्ताने करता येईल. मनन कसं करायचं याबाबत कोणत्याही पुस्तकात किंवा नेटवर माहिती मिळवता येईल.

l मन शांत असेल तर कोणताही विकार शरीराला शिवू शकणार नाही. त्यासाठी मन शांत करण्याचे व्यायाम गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर सुरू करायचे.

l सकारात्मक विचार तर नेहमीच करायचा. त्यासाठी कोणताही मुहूर्त पाहायची गरज नाही. नकारार्थी विचार कराल तर मन कलुषित होऊन त्रास होतो. त्यापेक्षा सगळ्यांबद्दल चांगलाच विचार मनात आणायचा.

l आनंद मिळत नसतो. तो मानण्यात असतो. आपण आनंदात आहोत ही सवय लावून घ्या. ?िमान त्यासाठी तरी गुरुपुष्यामृताचा मुहूर्त फायद्याचा ठरेल.

 सणांएवढाच महत्त्वाचा

गुरुपुष्यामृत योग म्हणजेच गुरू पुष्यनक्षत्र योग. हिंदुस्थानी संस्कृतीप्रमाणे हा योग सर्वात शुभ योग म्हणून ओळखला जातो. या दिवशी मग गुरुमंत्र किंवा आपल्या इष्टदेवाचे नामस्मरण करून आध्यात्मिक रितीरिवाज पार पाडले जातात. या मुहूर्तावर ही कार्ये केल्यास त्यात लाभ होतो असं म्हटलं जातं. पुष्य योग गुरुवारी किंवा रविवारी असेल तर त्याला महत्त्व असते. त्यावेळी या योगाला गुरुपुष्यामृत किंवा रविपुष्यामृत म्हटले जाते. आपल्याकडे हा योग अक्षय्य तृतिया, धनत्रयोदशी आणि दिवाळी या सणांएवढाच महत्त्वाचा मानतात.

 

 

 

आपली प्रतिक्रिया द्या